'कोणतीही दिशा नसलेलं पकाऊ भाषण, कणा नसलेला बाणा'; भाजपाची उद्धव ठाकरेंच्या भाषणावर सडकून टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 21:20 IST2022-01-23T21:20:36+5:302022-01-23T21:20:36+5:30
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आता भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे.

'कोणतीही दिशा नसलेलं पकाऊ भाषण, कणा नसलेला बाणा'; भाजपाची उद्धव ठाकरेंच्या भाषणावर सडकून टीका
मुंबई
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधला. यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांना माझ्या तब्येतीची खूप काळजी वाटत असली तरी त्या सर्व काळजीवाहू विरोधकांना मी सांगू इच्छितो की लवकरच बाहेर पडून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. सर्व काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवून देणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर आता भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे. "नेहमीप्रमाणे भाजपा बद्दलची मळमळ, जळजळ आणि कोहीती दिशा-धोरण नसलेले पकाऊ भाषण", असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
बाळासाहेबांना आदरांजली द्यायलाच विसरले!
ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्याच बाळासाहेबांना काँग्रेसकडून आंदरांजली वाहण्यात आलेली नसल्याचाही मुद्दा भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
"पोकळ स्वाभीमान आणि बोगस हिंदुत्त्वाबद्दल बाता करणाऱ्यांना दिल्लीच्या मालकाने शिवसेनाप्रमुखांना यंदाही आदरांजली व्यक्त न करता फाट्यावर मारले आहे. हाच यांचा कणा नसलेला बाणा", असंही भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नेहमीप्रमाणे भाजपा बद्दलची मळमळ, जळजळ आणि कोणतीही दिशा-धोरण नसलेले पकाऊ भाषण.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 23, 2022
पोकळ स्वाभिमान आणि बोगस हिंदुत्वाबद्दल बाता करणाऱ्याना दिल्लीच्या मालकाने शिवसेनाप्रमुखांना यंदाही आदरांजली व्यक्त न करता फाट्यावर मारले आहे. हाच यांचा कणा नसलेला बाणा.
काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे?
"अनेक दिवसांनी आपण समोर आलो आहोत. फेब्रुवारीत आपण सर्वजण एकत्र भेटलो होतो. सर्वकाही ठरलं आणि कोरोनाची दुसरी लाट आली. आताही दिवाळीच्या सुमारास राज्यभर फिरण्याचा विचार करत होतो, परंतु मानेचं दुखणं आलं आणि शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातून आता बाहेर आलो आहे. सर्वांच्या प्रेमामुळे आणि शुभेच्छांमुळे यातून बाहेर आलो. परंतु त्यानंतर आता कोरोनाची तिसरी लाट आली. लाटांमागून कोरोनाच्या लाटा येतायत तर शिवसेनेची लाट का आणू शकत नाही. जर एखदा विषाणू एकामागून एक लाटा आणू शकत असेल तर आपल्याकडे प्रचंड तेजस्वी भगव्याचा वारसा आहे," असं मत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात केलं.