मुंबई : अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरीचे वेळापत्रक ११ ते १३ सप्टेंबर असे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली.
या कालावधीत विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे व कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे अपेक्षित असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितले.
बुधवारपर्यंत अकरावी प्रवेशासाठी अंतिम मुदत शिक्षण विभागाकडून देण्यात आली होती. मात्र केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी विशेष फेरीचे वेळापत्रक पुन्हा शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.
विशेष अंतिम फेरीचे वेळापत्रक
११ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत नवीन कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी करणे.
कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कोट्यातील जागा शासनाकडे समर्पित करणे.
११ सप्टेंबर दुपारी १.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशक्षमता वाढवणे. ही संधी अंतिम असून, यानंतर सुविधा उपलब्ध होणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
११ सप्टेंबर रात्री ८ ते १२ सप्टेंबर सकाळी ९ वाजेपर्यंत अकरावी प्रवेशासाठी नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.
राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-१ मध्ये दुरुस्ती, भाग-२ भरणे व प्राधान्यक्रम यादीनुसार किमान १ ते कमाल १० कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करता येईल.
१२ सप्टेंबर दुपारी २ पासून ते १३ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी मिळालेल्या विद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
विविध कोट्यांतर्गत १ हजार ९६ प्रवेश निश्चित
बुधवारपर्यंत ‘ओपन टू ऑल’ अंतर्गत फेरीमध्ये एकूण १४ हजार ४२२ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे, तर सीएपी फेरीत १३,३२६ प्रवेश निश्चित झाले आहेत.
विविध कोट्यांतर्गत १,०९६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.