वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...

By यदू जोशी | Updated: December 5, 2024 05:32 IST2024-12-05T05:30:58+5:302024-12-05T05:32:40+5:30

‘मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मै समंदर हुं लौटकर जरूर आऊंगा’ ... आपल्याला घेरणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी एकदा हा शेर सुनावला होता. समंदर तर ते होतेच, लौटकर जरूर आऊंगा म्हणाले होते, आता त्यानुसार ते परतले आहेत. आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...

Special article on Devendra Fadnavis | वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...

वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...

यदु जोशी, सहयोगी संपादक

पुन्हा येईन’ म्हणत त्यांनी २०१९ मध्ये युतीची सत्ता आणलीच होती पण शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत गेली आणि फडणवीस यांना एकटे पाडले गेले. शरद पवार यांच्या रणनीतीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले असे म्हटले गेले, पण ते अर्धसत्य होते. मुळात काहीही झाले तरी उद्धव कधीही काँग्रेससोबत जाणार नाहीत असेच फडणवीस यांना वाटत होते. अगदी सत्तानाट्याच्या चारपाच दिवस आधी निवडक पत्रकारांना ते म्हणाले की, उद्धवजींचा स्वभाव मला माहिती आहे, ते आढेवेढे घेतील पण राहतील आमच्याचसोबत... मात्र पुढे घडले वेगळेच. मविआची सत्ता आली.

मविआ सरकारच्या पहिल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली. मी इथे येईन असे मी कधी म्हणालो नव्हतो तरीपण मला यावे लागेल असा चिमटा त्यांनी फडणवीस यांना काढला. ‘मी पुन्हा येईन असे ते म्हणाले होते त्यांनी कुठे बसेन हे सांगितले नव्हते’ या शब्दांत तेव्हाचे मंत्री जयंत पाटील यांनी खिल्ली उडविली. धनंजय मुंडेही ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते पण त्यांनी खिल्ली उडविली नाही. कारण बरीच वर्षे भाजपमध्ये, तेही फडणवीसांच्या मैत्रीत काढलेली असल्याने मुंडेंना फडणवीसांच्या क्षमता माहिती होत्या. ते म्हणाले, आज फडणवीस शांत आहेत, पण त्यांच्या डोक्यात उद्याचे बरेच काही चालले असेलच... फडणवीसांच्या डोक्यात तेव्हा काय चाललेले होते हे नंतर राज्याला कळलेच.

जी भूमिका मिळाली, ती निभावली...

पक्षाच्या आदेशानुसार मिळालेल्या भूमिकेला पूर्ण न्याय द्यायचा, त्यासाठी अखंड परिश्रम करायचे हा त्यांचा स्वभाव. नियतीने त्यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते केले. महाविकास आघाडीवर ते तुटून पडले. अँटेलिया स्फोटके प्रकरणात सरकारची त्यांनी अक्षरश: कोंडी केली. या प्रकरणात नाव असलेल्या मनसुख हिरेनचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला असल्याची धक्कादायक बातमी त्यांनी पहिल्यांदा विधानसभेतून राज्याला सांगितली, तेव्हा एकच खळबळ उडाली. अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, ते तुरुंगात गेले. सरकारी वकील प्रवीण चव्हाणच्या पुण्यातील कार्यालयातून गिरीश महाजन, जयकुमार रावल यांना एका प्रकरणात अडकविण्याचे आणि त्या आधारे फडणवीस यांनाही अडकविण्याचे षड्‌यंत्र रचले गेले. स्वत: फडणवीस यांनी या षड्‌यंत्राचे स्टिंग ऑपरेशन असलेली सीडी विधानसभा अध्यक्षांकडे दिली. त्या सीडीत काय काय आहे हे त्यांनी वाचून दाखवले तेव्हा राज्य हादरले. असे दणके ते मविआ सरकारला देत राहिले.

...अन् मग आला मोठा टर्निंग पॉइंट

जून २०२२ मध्ये दहा दिवसांच्या अंतराने झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये मविआला जबर धक्का फडणवीस यांच्या रणनीतीने दिला. बहुमत असलेल्या मविआचे उमेदवार पडले. राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली. चार-आठ दिवसांत प्रचंड घडामोडी घडल्या. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असे वाटत असताना स्वत: फडणवीस यांनीच शिंदे मुख्यमंत्री असतील आणि मी मंत्रिमंडळात नसेल असे जाहीर केले, तेव्हा खळबळ उडाली. पक्षनेतृत्वाने त्यांना निर्णय मागे घ्यायला लावत उपमुख्यमंत्रिपद घ्यायला लावले, त्यांनी ते स्वीकारले. २०२३ मध्ये पुन्हा एक भूकंप झाला. शरद पवारांची साथ सोडत अजित पवार महायुतीचा भाग झाले; दुसरे उपमुख्यमंत्री झाले. फडणवीस यांच्या पदाचा संकोच झाला, त्यावरूनही त्यांना हिणवले गेले पण ते धीरोदात्तच. सामाजिक आंदोलनामध्ये त्यांना लक्ष्य केले गेले, पातळी सोडून बोलले गेले, तरीही ते शांतचित्त राहिले. आज आपला नसेल उद्या आपलाच आहे हे ते जाणून होते. पक्ष आणि पक्षनेतृत्वावरील निष्ठा तसूभरही कमी झाली नाही, ते चालत राहिले. लोकसभा निवडणूक लागली, पुन्हा मोदी सरकार आले पण महाराष्ट्राने अपेक्षित साथ दिली नाही. अपयशाची जबाबदारी स्वीकारत फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली पण पक्षनेतृत्वाने त्यांना नाही म्हटले. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाची ‘ओनरशिप’ पक्षनेतृृत्वाने त्यांना दिली आणि मग फडणवीसांनी नेतृत्व आणि कर्तृत्वाचा प्रत्यय देत मायक्रोप्लॅनिंग सुरू केले. विरोधातील नेते एक घर पुढे चालत होते तेव्हा फडणवीस दहा घर पुढे चालत होते. दिवाळीच्या आधी खासगीत बोलताना ते म्हणाले, बघून घेशील, चमत्कार करणारे निकाल येतील आणि झालेही तसेच. १३२ जागा भाजपने जिंकल्या, महायुती सव्वादोनशे पार गेली. फडणवीस यांना विशिष्ट जातीचे असल्याचे लेबल लावले गेले पण या निवडणुकीत विविध समाजांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मतदान केले व ते लेबल खरडून टाकले. 

शिंदेंसोबत सरकार आणल्यानंतर फडणवीस एकदा विधानसभेत म्हणाले होते की, मला अनेकांनी खूप त्रास दिला, त्यांचा त्यांचा मी बदला घेणार आहे, मी त्यांना माफ केले हाच माझा बदला. आपल्याविषयी कितीही खालच्या शब्दांत कोणी बोलले असेल, कटकारस्थाने केली असतील तरी त्यांना माफ करत पुढे जाण्याची भूमिका घेणारा हा सुसंस्कृत नेता/मित्र आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत आहे.

आई म्हणते, ‘तो शांत, शूर, दयाळू, होतकरू...’

तो शांत, शूर, दयाळू आणि होतकरू आहे, कपटी तर तो नक्कीच नाही, त्याच्यावर नाही नाही ती टीका काही नेते करतात तेव्हा मी खूप व्यथित होते. कारण, माझा देवेंद्र कसा आहे ते मला चांगलेच ठाऊक आहे... आपला पुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होत असताना ‘लोकमत’शी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस खूपच भावनिक झाल्या.

तो नम्र आहे, संयमी तर आहेच, अनेकदा संयमाने त्याची परीक्षा बघितली पण दरवेळी तो मेरिटमध्ये  आला. कोणत्याही क्षेत्रात बिनडाग राहिले पाहिजे, आपल्या चारित्र्यावर कोणी शंका घेता कामा नये हा संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या वडिलांकडून (गंगाधरराव फडणवीस) यांच्याकडून देवेंद्रला मिळाल्याचे सरिता फडणवीस म्हणाल्या.

तो बिझी असतो, सतत कामात असतो; फिरतोही खूप पण आजही घरून निघताना रोज मला लवून नमस्कार करतो. मला काय हवे नको याकडे त्याचे लक्ष असते. त्याच्यावर रागावण्याची, त्याचा कान धरण्याची वेळ माझ्यावर कधीही आली नाही. त्याच्या प्रत्येक कृतीने त्याच्याविषयी माझा अभिमानच आजवर वाढविला आहे. खोटे बोलणे, खोटे; कृत्रिम वागणे त्याच्या स्वभावात कधीही नव्हते, असे त्या म्हणाल्या.

 राजकारणात कितीही बाका प्रसंग आला तरी तो संयमाने सामोरा जातो. बाहेर कितीही वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागत असले तरी त्याचा परिणाम तो घरात कधीही होऊ देत नाही. घर आणि राजकारण त्याने अगदी वेगळे ठेवले आहे. तो कुटुंबवत्सल आहे. प्रत्येक नातेवाइकाकडील प्रसंगाला तो जातोच पण अगदीच शक्य झाले नाही तर पुढे कधी त्या शहरात गेल्यावर नक्की त्यांच्या घरी जातो. आमच्या कुटुंबातील प्रत्येकाचा तो आवडता आहे. सख्खा, चुलत, जवळचा, दूरचा नातेवाईक असे आमच्याकडे काहीही नसते. तो सगळ्यांशीच तेवढ्याच जिव्हाळ्याने वागतो, अशी भावना सरिता फडणवीस यांनी व्यक्त केली.

वाढदिवस, दिवाळीला तुम्ही देवेंद्र यांना काय गिफ्ट देता असे विचारले असता त्या म्हणाल्या की, त्याला पैसे जमा करण्याचा हव्यास नाही. पैसा पाहिजेच कशाला, असे तो म्हणतो. त्याच्या खिश्यात पैसे कधीही नसतात. वाढदिवस, दिवाळीला मी त्याला माझ्या परीने जमेल तितके पैसे देते, कधी पाच हजार तर कधी दहा हजार. त्याच्याजवळ नाही ते माझ्या यथाशक्ती देण्याचा मला खूप आनंद होतो. 

दातृत्व... रुग्णांच्या अश्रूंची पुन्हा होतील फुले

समाजातील शेवटच्या माणसाच्या सेवेची नुसती भाषा करता कामा नये, त्याला कृतीची जोड दिलीच पाहिजे. उपचाराअभावी, पैशांअभावी कोणत्याही गरीब माणसाच्या आरोग्याची हेळसांड होता कामा नये हा विचार समोर ठेवत देवेंद्र फडणवीस यांनी मार्च २०१५ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयातील सातव्या मजल्यावर वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला. मंत्रालयात पोहोचणे तसे सामान्यांना कठीणच पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट आपल्या डोक्यावर (मुख्यमंत्री सहाव्या माळ्यावर बसतात) या आरोग्य कक्षाला जागा दिली आणि भुदरगडपासून भामरागडपर्यंतच्या वंचितांना उपचारासाठी मदत मिळणे सुरू झाले. नामांकित हॉस्पिटल्स गरिबांसाठी राखीव असलेले बेड्‌स द्यायला टाळाटाळ करायचे. फडणवीस यांनी आदेशच काढला की कोणी कितीही बडे लोक असतील तरी त्यांना गरिबांसाठी राखीव बेड ठेवायला सांगा, नाहीतर कारवाई करावी लागेल. त्यानंतर मोठमोठ्या इस्पितळांमध्ये सामान्यांना उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या कक्षाचे काम कसे चालले आहे याचा दर आठपंधरा दिवसांनी ते आढावा घेत. ओमप्रकाश शेटे या कक्षाचे प्रमुख होते. हजारो रुग्णांना कोट्यवधी रुपयांचे उपचार मोफत मिळाले. या कक्षामुळे बरे झालेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे फडणवीस यांचे सदिच्छादूत बनले. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळण्याची जी कारणे दिली गेली त्यात फडणवीसांच्या आरोग्य यज्ञाचा आवर्जून उल्लेख झाला.

राज्यात २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. आधी पत्रकार राहिलेले मंगेश चिवटे यांना शिंदे यांनी मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे प्रमुख केले. त्यांनीही रुग्णसेवेचे कार्य अखंडपणे चालविले. मुख्यमंत्री नसलो म्हणून रुग्णसेवेची बांधिलकी थांबवता कशी येईल? या विचाराने २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष स्थापन करण्यात आला. आरोग्यदूत रामेश्वर नाईक या कक्षाचे प्रमुख झाले आणि रुग्णसेवेचा प्रवास पुन्हा सुरू झाला. आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत. सातव्या मजल्यावरील कक्षात आता तीच गर्दी असेल, आजार जाऊन पूर्वीसारखेच आयुष्य पुन्हा जगता यावे या आशेने रुग्ण व त्यांचे नातेवाईक येतील आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचा कक्ष रुग्ण, त्यांच्या आप्तेष्टांच्या अश्रूंची फुले करत राहील.

देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस

जन्मतारीख : २२ जुलै १९७०

पालक :  आई - सरिता आणि

वडील - स्व. गंगाधरराव फडणवीस

पत्नी: अमृता फडणवीस

मुलगी : दिविजा

शिक्षण

एल. एल. बी. (नागपूर विद्यापीठ)

व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी.

डी. एस. ई. बर्लिन या जर्मनीतील संस्थेमधून ‘डिप्लोमा इन मेथड्स अ‍ॅन्ड टेक्निक्स ऑफ मॅनेजमेंट’

राजकीय जबाबदारी

नगरसेवक, नागपूर महापालिका (१९९२-९७ आणि १९९७-२००१)

महापौर/मेयर इन कौन्सिल, नागपूर (१९९७ ते २००१)

महाराष्ट्र विधानसभा सदस्य ( १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९, २०२४)

मुख्यमंत्री, महाराष्ट्र (२०१४ - २०१९)

विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा (२०१९-२०२२)

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

(२०२२ पासून)

संघटनात्मक जबाबदारी

१९८९ भाजप वॉर्ड संयोजक

१९९० नागपूर पश्चिम

कार्यकारिणी सदस्य

१९९२ भाजयुमो, नागपूर शहर अध्यक्ष

१९९४ भाजयुमो,

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

२००१ भाजयुमो राष्ट्रीय उपाध्यक्ष

२०१० महाराष्ट्र प्रदेश भाजप सरचिटणीस

२०१३ महाराष्ट्र प्रदेश भाजपध्यक्ष

२०२० भाजप निवडणूक प्रभारी, बिहार

२०२२ भाजप निवडणूक प्रभारी, गोवा

विधिमंडळातील कार्य

१९९९ पासून सलग २५ वर्ष आमदार

अंदाज समितीचे सदस्य

नगरविकास व गृहनिर्माण विषयीच्या स्थायी

Web Title: Special article on Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.