Sparrows, peacocks grew; So the vultures, the eagles fell | थोडी खुशी थोडा गम ; मोर आणि चिमण्या वाढल्या, तर गिधाडे आणि गरुड घटले

थोडी खुशी थोडा गम ; मोर आणि चिमण्या वाढल्या, तर गिधाडे आणि गरुड घटले

मुंबई : गेल्या काही दशकांत भारतीय मोरांची आणि चिमण्यांची संख्या वाढली असल्याची सुखद बातमी समोर आली आहे. मात्र, याच कालावधीत इतर ५० टक्के पक्षी प्रजातींची संख्या घटली असल्याची आकडेवारी चिंता वाढविणारी आहे.

भारतात प्रथमत:च सिटीझन सायन्स या संकल्पनेचा वापर करून पक्ष्यांच्या सद्यस्थितीचा ‘भारतीय पक्षी सद्यस्थिती अहवाल २०२०’ तयार केला गेला. या अहवालातून भारतातील पक्ष्यांचे वितरण आणि विपुलता यांचा कल कसा आहे हे पहिल्यांदाच समोर आले आहे. या अहवालात सुमारे ८६७ भारतीय पक्ष्यांच्या सद्यस्थितीचा मागोवा घेण्यात आला आहे.

पक्षी निरीक्षकांनी संकलित केलेल्या माहितीवरून, पक्ष्यांच्या कोणत्या जातींचे संवर्धन होणे गरजेचे आहे आणि कोणत्या जाती सुरक्षित आहेत हे आता अधिकृतरित्या सिद्ध झाले आहे. गेल्या २५ वर्षांत पक्ष्यांच्या ४८ टक्के जाती सुरक्षित, स्थिर आणि वाढल्या असल्याचे शुभ वर्तमान या अहवालाने दिले आहे. त्याचवेळी गेल्या ५ वर्षात सुमारे ७९ टक्के पक्ष्यांचा जाती घटल्याचे निदर्शनास आले आहे. या अहवालानुसार भारतातील १०१ पक्ष्यांच्या जातींना संरक्षण मिळणे गरजेचे आहे. शिकारी पक्षी, स्थलांतरित पाणपक्षी आणि चिखले, आणि अधिवासनिष्ठ पक्षी यांच्या संख्येत कमालीची घट आढळली. हा अहवाल १५ हजार ५०० पक्षी निरीक्षकांच्या १ कोटींहून अधिक नोंदी वापरून बनविला आहे.
 
सहभाग कोणाचा?
या कामामध्ये भारतातील दोन सरकारी आणि आठ स्वयंसेवी संस्था सहभागी होत्या. त्यामध्ये अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलोजी एंड एन्व्हायर्नमेंट, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, फाऊंडेशन फॉर ईकॉलोजीकल सिक्युरिटी, नॅशनल बायोडायव्हरर्सिटी आॅथॉरिटी, नॅशनल सेंटर फॉर बायोलोजीकॅल सायन्स, नेचर कॉन्झरवेशन फौंडेशन, सलीम आली सेंटर फॉर ओर्निथोलोजी एंड नॅचरल हिस्ट्री , वेटलँडस इंटरनॅशनल साउथ एशिया , वाईल्ड लाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया आणि वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर इंडिया यांचा सहभाग होता.

चिमण्यांचे काय?
भारतात सर्वत्र चिमण्यांची संख्या तुलनात्मक दृष्ट्या स्थिर आहे किंवा वाढत आहे, पण शहरी भागात मात्र त्यांची संख्या कमी होत चालली आहे.

या अहवालानुसार सामान्य पक्षांची संख्या कमालीची घटत आहे आणि ही संख्या आणखी घटण्याआधीच त्यांच्या संवर्धनासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
- डॉ. राजा जयपाल, एसएसीओएन
 
पूर्वी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी घेण्यात येणारे निर्णय वस्तुनिष्ठ माहिती अभावी घेतेले जायचे, पण या अहवालातून पुढे आलेली माहिती विश्वसनीय असून यापुढे पक्षी संवर्धनासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी ती उपयुक्त ठरेल.
- डॉ. धनंजय मोहन, संचालक डब्ल्यूआयआय
 
हा अहवाल म्हणजे भारताची समृद्ध जैविविधता समजून घेण्याच्या दिशेन पुढे पडलेले पाऊल होय. पक्षांचे पर्यावरणातील महत्व आणि सर्वव्यापी अस्तित्व हे आपले पर्यावरण सुरक्षित असल्याचे सूचक असतात. त्यामुळे पक्ष्यांच्या सद्यस्थिती अहवालाला अनन्यसाधारण महत्व आहे. वन्यजीव संवर्धनासाठी सिटीझन सायन्सचा शास्त्रीय वापर करण्याबाबत आपण सर्वांनी मिळून एक पावूल पुढे टाकले आहे. या अहवालातून पुढे आलेली माहिती, पक्षी संवधार्नासाठी काम करणाऱ्या संस्था आणि लोकांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करेल.
- डॉ. मौसमी घोष, एनसीबीएस
 
पक्षी निरीक्षकांच्या भरीव सहभागामुळेच भारतासारख्या देशातून अशा प्रकारची उत्तम माहिती संकलित होऊ शकली.
- डॉ. गिरीश जठार, बीएनएचएस

गेल्या २५ वर्षांत सर्वाधिक घट झालेल्या पक्षी प्रजाती

White-rumped Vulture – पांढरपाठ गिधाड
Richard's Pipit – रिचर्डची तीरचिमणी
Indian Vulture –  भारतीय गिधाड
Large-billed Leaf Warbler – मोठ्या चोचीचा वटवट्या
Pacific Golden Plover – सोनेरी चिखला
Curlew Sandpiper – कुरल तुतारी

गेल्या २५ वर्षांत वाढ झालेल्या पक्षी प्रजाती
Rosy Starling –  भोरडी
Feral Pigeon –  कबुतर
Glossy Ibis –  तकाकी कुदळ्या
Plain Prinia –  साधा वटवट्या
Ashy Prinia – राखी वटवट्या
Indian Peafowl –  भारतीय मोर

Web Title: Sparrows, peacocks grew; So the vultures, the eagles fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.