भाजप - शिंदेसेनेत ठिणग्या पडायला सुरुवात होणार..?

By अतुल कुलकर्णी | Updated: May 26, 2025 09:14 IST2025-05-26T08:35:35+5:302025-05-26T09:14:29+5:30

गेल्या काही दिवसांत महायुतीतून जी वेगवेगळी विधाने येत आहेत ती ऐकली तरीही हे एकत्र लढतील का?

Sparks will start flying between BJP and Shinde Sena on the occasion of the municipal elections | भाजप - शिंदेसेनेत ठिणग्या पडायला सुरुवात होणार..?

भाजप - शिंदेसेनेत ठिणग्या पडायला सुरुवात होणार..?

अतुल कुलकर्णी 
संपादक, मुंबई

मुंबई महापालिकेत २२७ जागा आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी मुंबईत आपण १८६ जागा जिंकू असा दावा लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला होता. काही दिवसांपूर्वी शिंदेसेनेने मुंबईच्या १०० जागांवर दावा केल्याची बातमी आली. विधानसभेचा भाजपचा स्ट्राइक रेट महापालिकेतही तसाच काम करेल असे गृहीत धरले तर शेलारांच्या मनातले संख्याबळ मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेत भाजपला किमान २०० ते २२५ जागा लढवाव्या लागतील. मुळात जागा २२७ आहेत. त्यात शिंदेसेनेने १०० जागा मागितल्या आहेत. भाजपने किमान १५० जागा जिंकायच्या ठरवल्या तर शिंदेसेनेला तरी माघार घ्यावी लागेल किंवा भाजपला स्वतःचे स्वबळ विसरावे लागेल. त्याशिवाय यातून मार्ग निघू शकणार नाही. मुंबईत उद्धवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे काहीच परिणाम करणार नाही, असे गृहीत धरून या दोघांची नुरा कुस्ती सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांत महायुतीतून जी वेगवेगळी विधाने येत आहेत ती ऐकली तरीही हे एकत्र लढतील का? असा प्रश्न निर्माण होतो. रायगडमध्ये खा. सुनील तटकरे यांनी शिंदेसेनेच्या भरत गोगावले यांची नक्कल करून खिल्ली उडवली. अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भात स्वबळावर महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्याचा दावा केला. त्याला उत्तर म्हणून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती एकत्र लढेल असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही अपवाद वगळता, महायुती एकत्र लढेल असे विधान केले आहे. दुसरीकडे शिंदेसेनेचे संजय शिरसाट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. शिंदेसेनेच्या नीलम गोन्हे यांनी पुण्याच्या हुंडाबळी प्रकरणावरून अजित पवारांवर शालजोडीतून टीकेचे बाण सोडले. महायुतीतील हे एकमेकांशी संवाद साधणारे 'प्रेमाचे सूर' ऐकले तर संगीताच्या अंतिम मैफिलीत भैरवीचा बैंड वाजेल असे काँग्रेसला वाटते.

शेजाऱ्याच्या घरात बँड वाजला म्हणून काँग्रेसच्या घरातून फार तर पेढे वाटले जातील, पण काँग्रेसच्या हाती रिकाम्या पाळण्याचीच दोरी राहील. आम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाही हे विधान काँग्रेस नेते सर्वत्र खरे करून दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. आताही तेच होत आहे. महापालिका असो की जिल्हा परिषद, यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे... स्वतःला झोकून दिले आहे... अशी स्वप्न देखील काँग्रेस नेत्यांना कधीच पडत नाहीत. 'हम जहाँ खडे होते है, लाईन वही से शुरू होती है...' या डायलॉगवर काँग्रेसचा कदाचित गाढा विश्वास असावा. शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये औषधालाही उरलेली नाही. हे असे चित्र असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या नाही तरी निदान मुंबई, ठाणे, नाशिक या बेल्टमध्ये मोठी हलचल होऊ शकते; पण हे दोन बंधू एकत्र आले तर दोन्ही पक्षांतल्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांना आपले दुकान लंबे होईल याची भीती वाटत असावी. त्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र येऊ नयेत, अशीच विधाने दोन्ही बाजूचे नेते सतत करत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामुळे भाजपकडे इनकमिंग जोरात आहे. शिंदेसेनेकडे गेल्यावर आम्हाला 'एम टॉनिक' मिळते असे जाणारेच जाहीरपणे सांगत आहेत. खरे खोटे त्या दोघांना माहिती. शिंदेसेनेने मुंबईत ज्या माजी नगरसेवकांना उमेदवारी द्यायची आहे त्यांच्या मतदारसंघासाठी विकासनिधी तातडीने देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यातून या माजी नगरसेवकांना 'बळ' मिळेल अशी व्यवस्था केली जात आहे. हे जे चालू आहे ते आमच्या नेत्यांना कळत नाही असे तुम्हाला वाटते का ? त्यांच्या 'एम टॉनिक'च्या बाटल्या कुठे थांबवायच्या हे आम्हाला चांगले समजते, असा दावा भाजपचे नेते खासगीत करत आहेत.

काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. तो फोटो पाहिल्यानंतर वर्षानुवर्षे भाजपमध्ये काम करणारे कार्यकर्ते काय विचार करत असतील? ज्यांच्या विरोधात आपण काम केले तेच आता आपल्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. मग आपण काय करायचे? असा प्रश्न त्यांना पडला तर... असा सवाल मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केला. मात्र हे चित्र बारकाईने बघितले तर ही भविष्यातल्या राजकारणाची नांदी आहे असे म्हणता येईल. या छायाचित्रात शिंदेसेनेचा एकही नेता नाही. याचा अर्थ भविष्यात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशीच मांडीला मांडी लावून पुढे जाऊ लागली तर..? याचे उत्तर महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळेल.

Web Title: Sparks will start flying between BJP and Shinde Sena on the occasion of the municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.