विदेशी सिगरेट तस्करीतील सुत्रधारांवर लवकरच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 06:32 PM2020-06-13T18:32:33+5:302020-06-13T18:33:09+5:30

तस्करीचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न

Soon action will be taken against the facilitators of foreign cigarette smuggling | विदेशी सिगरेट तस्करीतील सुत्रधारांवर लवकरच कारवाई

विदेशी सिगरेट तस्करीतील सुत्रधारांवर लवकरच कारवाई

Next

 

खलील गिरकर

 

मुंबई : कोट्यवधी रुपये किंमतीच्या विदेशी महागड्या सिगरेट तस्करीमध्ये गुंतलेल्या सर्व संबंधित सुत्रधारांवर लवकरच कडक कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून चौकशी पूर्ण झाल्यानंतर यामध्ये गुंतलेल्यांवर कारवाई करुन या तस्करीचे समूळ उच्चाटन करण्याचा मनोदय डीआरआयचे सहसंचालक समीर वानखेडे यांनी व्यक्त केला.

खजुराच्या आयातीच्या नावावर न्हावाशेवा येथे तब्बल 11 कोटी 88 लाख रुपयांच्या विदेशी सिगरेट जप्त करण्याची कामगिरी महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) ने नुकतीच केली. गुडांग गरम, डनहिल स्विच, हड्ज या सारख्या परदेशी सिगरेटची तस्करी करण्यात आली होती. 40 फूट कंटेनरमधून ही तस्करी करण्यात आली होती. आरोपींना 26 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बेरोजगार व अशिक्षित तरुणांच्या कागदपत्रांवर खोट्या कंपन्याद्वारे आयात बेरोजगार व अशिक्षित तरुणांना परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वीजेचे बिल, पॅनकार्ड अशी कागदपत्रे घेऊन त्याच्या सहाय्याने बनावट कंपन्या तयार केल्या गेल्या व त्यासाठी जीएसटी व आयात निर्यात क्रमांक मिळवून देण्यात आले त्यानंतर या कंपन्यांच्या नावावर आयात करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. विदेशी सिगरेट भारतात आणण्यास व विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे या सिगरेटची चोरटी विक्री केली जाते व त्याचे दर जास्त असतात. नेहमीच्या वेळी या सिगरेट तीनशे ते साडेतीनशे रुपये किंमतीत विकल्या जातात. 

कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये विदेशी सिगरेट सहजासहजी उपलब्ध नसल्याने चढ्या दराने त्याची विक्री केली जात होती. लॉकडाऊनमध्ये या सिगरेट पाकिटाची किंमत दुप्पट होऊन सातशे ते आठशे रुपये किंमतीत याची विक्री होत होती. लॉकडाऊनमध्ये एकीकडे सर्व व्यवसाय ठप्प झालेले असताना एवढा दुप्पट नफा मिळत असल्याने पूर्ण कंटेनर भरुन या विदेशी सिगरेट छुप्या मार्गाने तस्करीद्वारे आयात करण्यात आल्या. मात्र डीआरआयच्या कर्तव्यदक्ष व सतर्क अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच हा तस्करीचा प्रकार उध्द्वस्त करण्यात आला. 

विदेशातून येणाऱ्या विदेशी प्रवाशांना 200 सिगरेट बाळगण्याची परवानगी आहे. हवाई मार्गाने या सिगरेट आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंद असल्याने समुद्रीमार्गे  मोठ्या प्रमाणात तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सध्या बोगस कागदपत्रे बनवून आयात करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये गुंतलेल्या इतरांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. 

 

Web Title: Soon action will be taken against the facilitators of foreign cigarette smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.