सोनिया सेठी ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी; पूर्णवेळ अधिकारी मिळाल्यानं आता सेवेत सुधारणा आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 07:23 IST2025-09-27T07:22:33+5:302025-09-27T07:23:20+5:30
बेस्टच्या स्वमालकीच्या ताफ्यात केवळ ४१८ बस शिल्लक असून, त्या मानाने भाडेतत्त्वावरील गाड्यांची संख्या अधिक आहे.

सोनिया सेठी ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी; पूर्णवेळ अधिकारी मिळाल्यानं आता सेवेत सुधारणा आवश्यक
मुंबई - बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी सोनिया सेठी यांची राज्य सरकारने नियुक्ती केली. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास सेवानिवृत्त झाल्यानंतर अंतरिम व्यवस्था म्हणून आशिष शर्मा यांच्याकडे बेस्टचा तात्पुरता कार्यभार महिनाभरापूर्वी सोपविण्यात आला होता. आता पूर्णवेळ महाव्यवस्थापक म्हणून सेठी यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असताना मदत कार्यात आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सेठी या महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. बदलीचा निर्णय झाला तेव्हा त्या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीत होत्या. सेठी यांच्या जागी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विनिता वैद सिंगल यांची बदली करण्यात आली आहे.
पूर्णवेळ अधिकारी
काही महिन्यांपासून बेस्टला पूर्णवेळ महाव्यवस्थापक नव्हते. अनिल डिग्गीकर यांच्यानंतर बेस्टच्या महाव्यस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार सुरुवातीला एस. व्ही. आर. श्रीनिवास आणि आशिष शर्मा यांच्याकडे होता. आता सेठी यांच्या नियुक्तीमुळे बेस्टला पूर्णवेळ महाव्यस्थापक मिळाले आहेत.
बेस्ट सेवेत आता सुधारणा आवश्यक
बेस्टच्या स्वमालकीच्या ताफ्यात केवळ ४१८ बस शिल्लक असून, त्या मानाने भाडेतत्त्वावरील गाड्यांची संख्या अधिक आहे. मात्र, नियमानुसार बेस्टच्या ताफ्यात ३ हजारांपर्यंत स्वमालकीच्या गाड्यांचा ताफा असणे आवश्यक आहे. अशा गाड्यांत वाढ करण्यासाठी नवीन महाव्यवस्थापकांनी कार्यवाही प्राधान्याने करावी, अशी मागणी संघटनांमधून होत आहे.