MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 14:13 IST2024-06-17T14:08:35+5:302024-06-17T14:13:08+5:30
MHT CET 2024 Results: पार्थ वैती (Parth Vaity) यानं नुकत्याच जाहिर झालेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त केलेत.

MHT CET 2024 Results: पैकीच्या पैकी! रिक्षाचालकाच्या मुलाची उत्तुंग झेप, MHT CET मध्ये १०० पर्सेंटाइल
तुमच्यासमोर कितीही अडचणी असल्या, प्रतिकूल परिस्थितीनं ओढाताण होत असली तरी मेहनतीचं फळ मिळतंच हे मुलुंडमधील एका रिक्षाचालकाच्या मुलानं सिद्ध करुन दाखवलं आहे. पार्थ वैती (Parth Vaity) यानं नुकत्याच जाहिर झालेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त केलेत. इंजिनिअरिंग, फार्मसीचे प्रवेश निश्चित करणाऱ्या एमएचटी-सीईटीचे निकाल रविवारी जाहीर झाले. यंदा राज्यात एकूण ३७ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल गुण प्राप्त केलेत. त्यात पार्थ याचाही समावेश आहे.
एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यंदा एकूण ७ लाख २५ हजार ५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात ३.१ लाख पीसीबीचे विद्यार्थी होते. त्यापैकी २.९ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर पीसीएमकरिता नोंदणी केलेल्या ४.१ लाख विद्यार्थ्यांपैकी ३.८ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
मुलुंड येथील रहिवासी असलेल्या पार्थने शिष्यवृत्तीच्या मदतीने अभ्यास पूर्ण केला आणि JEE ॲडव्हान्समध्येही यश मिळवले. ओबीसी विभागात त्यानं ऑल इंडिया ५० वा रँक प्राप्त केला आहे. पार्थ म्हणतो, "लहानपणापासून मला आयआयटीमध्ये शिक्षण घेण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली. आता माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. जर मला खरोखर चांगली प्लेसमेंट मिळाली तर मी माझ्या पालकांना आर्थिक हातभार लावू शकेन. भविष्यात, मला भौतिकशास्त्रात संशोधन करण्याची इच्छा आहे"
मुलांचा वरचष्मा
एमएचटी-सीईटीत १०० पर्सेंटाइल मिळवणाऱ्या पीसीएमच्या २० विद्यार्थ्यांमध्ये १३ मुलं आहेत. तर सात मुली आहे. पीसीएमसाठी एकूण १.४ लाख मुलींनी सीईटी दिली. तर २.४ मुलांनी परीक्षा दिली. पीसीबीसाठी १.७ लाख मुलींनी आणि १.३ लाख मुलांनी सीईटी दिली.