फ्लॅट नावावर का करत नाही? घरासाठी मुलाने वडिलांचे दोन्ही पाय केले फ्रॅक्चर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 09:30 IST2025-05-28T09:30:01+5:302025-05-28T09:30:10+5:30
लाकडी पट्टीने केली बेदम मारहाण; दहिसर पोलिसांत गुन्हा दाखल

फ्लॅट नावावर का करत नाही? घरासाठी मुलाने वडिलांचे दोन्ही पाय केले फ्रॅक्चर
मुंबई : फ्लॅट नावावर का करत नाही? अशी विचारणा करत पोटच्या मुलाने विजय साटले (७५) यांना लाकडी पट्टीने पायावर बेदम मारहाण केली. त्यात त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. दहिसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार साटले हे दहिसर पूर्वच्या घरटनपाडा क्रमांक २ येथे राहतात. त्यांची पत्नी वसंती यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर त्यांची काळजी दहिसरच्याच वैशालीनगर परिसरात राहणारा लहान मुलगा मिथुन (४५) हा घेत असून आरोपी मुलगा किशोर (४७) हा सिंधुदुर्गच्या सावंतवाडी परिसरात राहतो. तक्रारदाराच्या मालकीचा जोगेश्वरीच्या हरीनगर परिसरात नवकिरण सोसायटीमध्ये एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट किशोरला स्वतःच्या नावावर करायचा होता. यावरून त्यांच्यात वाद होत होते.
शेजारी धावले मदतीला...
मारहाणीचा प्रकार त्यांचे शेजारी महादेव घुले यांनी पाहिल्यावर त्यांनी लगेचच मिथुनला फोन करत याची माहिती दिली. त्यानंतर मिथुनने घरी धाव घेत जखमी वडिलांना कांदिवली पश्चिमच्या शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासल्यावर त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याचे निदान करून त्यांना रुग्णालयात दाखल केले.
एकटे असताना मारहाण
२५ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास तक्रारदार घरी एकटे असताना किशोर घरी आला आणि जोगेश्वरीचा फ्लॅट नावावर करण्यासाठी वाद घालू लागता. त्यानंतर दरवाज्याच्या मागे असलेल्या लाकडी पट्टीने वडिलांच्या दोन्ही पायांवर मारायला सुरुवात केली. त्यामुळे साटले हे जमिनीवर कोसळले त्यानंतर किशोरने पाठीवरही पट्टीने मारहाण केली.