काही एक्स्प्रेस एलटीटीपर्यंतच; लोकल वेळेवर धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:07 IST2026-01-15T11:07:43+5:302026-01-15T11:07:43+5:30
सीएसएमटी स्थानकावरील ताण होणार हलका

काही एक्स्प्रेस एलटीटीपर्यंतच; लोकल वेळेवर धावणार
मुंबई: सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे थांबणाऱ्या काही एक्सप्रेस पुढील काळात लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे थांबवण्याचा आणि तिथूनच सोडण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मंजुरीनंतर नवीन बदल लागू होतील. त्यामुळे लोकल वेळेवर धावतील आणि लोकलची गर्दी कमी होईल अशी अपेक्षा आहे.
मध्य रेल्वेवर विशेषतः सकाळच्या गर्दीच्या वेळी उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस उशिरा येत असल्याने संपूर्ण रेल्वे मार्गावर मोठा ताण येतो. जेव्हा एक्सप्रेस कल्याणमधून मुंबईच्या दिशेने यायला निघते तेव्हा विद्याविहार, कुर्लापर्यंत मार्गिका सहावी असल्याने तिथपर्यंत ती लोकल मार्गावर वळवली जात नाही. परंतु तिथून पुढे सीएसएमटीपर्यंत यायला स्वतंत्र मार्ग नसल्याने लोकल मार्गावर वळवावे लागते. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक बिघडते आणि गर्दी वाढून त्याचा नाहक त्रास प्रवाशांना करावा लागतो.
प्रवाशांना दिलासा
रेल्वेचा ताण कमी करण्यासाठी काही एक्सप्रेस गाड्यांचे संचलन सीएसएमटी ऐवजी एलटीटी येथून करण्याचा विचार आहे. जेणेकरून या एक्सप्रेस विद्याविहारवरून थेट एलटीटी दिशेला जातील आणि सकाळच्या सत्रात विलंब टाळता येईल.
गर्दीच्या वेळी लोकलला ट्रॅक उपलब्ध होणार
आणखी काही एक्सप्रेस प्रस्तावात पंचवटी एक्सप्रेससह गाड्यांचा समावेश असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकलला टँकची उपलब्धता वाढून लोकलचे संचलन अधिक वेळेत व नियमितपणे करता येणार असल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर हा बदल टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार असून, त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.