'फडणवीस दावोसमधून मुंबईत आल्यावर काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात', संजय राऊत काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:03 IST2026-01-23T17:54:59+5:302026-01-23T18:03:32+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदेसेना आणि मनसे एकत्र आल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले. स्थानिक भाजपामध्ये अस्वस्थता आहे, तर उद्धवसेनेतून नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

'फडणवीस दावोसमधून मुंबईत आल्यावर काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात', संजय राऊत काय बोलले?
शिंदेसेना आणि भाजपामध्ये स्थानिक पातळीवर शीत युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेसेनेने मनसेला सोबत घेण्याच्या घटनेकडे सध्या राजकीय वर्तुळातून याचं अंगाने बघितले जात आहे. त्यामुळे दररोज नवनव्या चर्चांना तोंड फुटत आहे. त्यातच आता उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस दावोसवरून मुंबईत आल्यावर वेगळं घडू शकते असे म्हटले आहे. राऊतांच्या याच विधानाचे आता वेगवेगळे अर्थ काढण्यास सुरूवात झाली आहे.
महापालिकांचे निकाल लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेले. पण, शिंदेसेना आणि भाजपाला बहुमत मिळालेल्या महापालिकांमध्ये कोणाचा महापौर बसणार याची चर्चा सुरू असतानाच शिंदेसेनेकडून ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू झाले.
मुख्यमंत्री शिंदेसेना-मनसे युतीवर काय बोलले?
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदेसेनेने मनसेला सोबत घेतले. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीमुळे राजकारण रंगले आहे. या आघाडीबद्दल जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले की, 'मी आता दावोसमध्ये लक्ष्य केंद्रीत केले आहे. महाराष्ट्रात येईल तेव्हा महाराष्ट्रातील सर्व करारांची माहिती देईन.'
मुख्यमंत्री फडणवीसांच्या याच विधानावर जेव्हा उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी एक मोठे विधान केले.
संजय राऊतांच्या विधानाने चर्चेला हवा
कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जे घडले आहे, ते फडणवीसांना पटलं असेल, असे तुम्हाला वाटते का?, असा प्रश्न संजय राऊतांना विचारण्यात आला.
खासदार राऊत म्हणाले, "मला असं वाटतं नाही की हे फडणवीसांना पटलं असेल. हे मी आधीच बोललो आहे. दावोसमधून मुंबईला आल्यावर अनेक विषयांवर काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात. त्यांच्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की, आपण खूप मोठे कार्य केलेले आहे. पण, मुख्यमंत्री हा राज्याचा बॉस असतो. सत्ता त्याची असते.
राज ठाकरे म्हणाले, 'लवचिक भूमिका स्वार्थासाठी नाही'
कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेवरून राज ठाकरे यांच्यावरही टीका होत आहे. या समीकरणामुळे राज ठाकरे हे कायम भूमिका बदलात, या जुन्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले.गेल्या दोन-तीन दिवसांपासून होत असलेल्या चर्चांवर राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी लिहिलेल्या पोस्टमधून उत्तर दिले.
"राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल", असे म्हणत राज ठाकरेंनी या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.