पश्चिम द्रुतगती मार्गावरील अडचणी सोडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 01:12 PM2020-08-16T13:12:23+5:302020-08-16T13:12:59+5:30

जोगेश्वरी ते अंधेरी दरम्यानच्या रस्त्याची पाहणी.

Solve problems on the Western Expressway | पश्चिम द्रुतगती मार्गावरील अडचणी सोडवा

पश्चिम द्रुतगती मार्गावरील अडचणी सोडवा

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचे महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी शनिवारी सकाळी पश्चिम द्रुतगती मार्गावर जोगेश्वरी ते अंधेरी दरम्यानच्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी या मार्गावरून प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या अडचणी राजीव यांनी समजावून घेतल्या. आणि या अडचणी लवकरात लवकर सोडवून प्रवाशांसाठी हा रस्ता अधिकाधिक वेगवान आणि सुरक्षित होईल; याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे म्हणणे मांडले. दरम्यान, याचवेळी आयुक्तांनी पारसी पंचायत सबवे येथील कामाची पाहणी केली. आणि येथील कामाचा नागरिकांना त्रास होणार नाही, असे काम करण्याच्या सुचना कंत्राटदारास दिल्या.

पावसाळयात खड्डे पडू नयेत म्हणून मुंबई शहरातील प्रत्येक प्रशासकीय संस्था जसे की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम खाते आणि इतर संस्था रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतात. खड्डे भरण्याची कामे हाती घेतली जातात. मात्र पावसाळा संपला तरी खडडे काही भरले जात नाही. आणि नेहमीच हा विषय वादात राहतो. परिणामी किमान कोरोनाच्या काळात तरी नागरिकांना खड्ड्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून मुंबईकरांनी मुंबई महानगर पालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत पत्रव्यवहार करत यंदाचा पावसाळा तरी खड्डेमुक्त राहू द्या; अशी याचनाच केली आहे.

कोरोनामुळे मुंबईत मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. मार्च, एप्रिल, मे वगळता जूनपासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणले आहेत. पाऊस आणि त्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे यात भर घालत आहेत. मुंबई महापालिका, एमएमआरडीए आणि उर्वरित प्राधिकरणांच्या वादात रस्त्यावरील खड्डे बुजविण्याऐवजी तसेच आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग, अंधेरी-कुर्ला रस्ता, सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्गांसह छोटया मोठया रस्त्यांवर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. सिमेंटच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण कमी असले तरी जिथे जिथे खोदकाम करण्यात आले; अशा ठिकाणी खड्डे अधिक आहेत. येथे सातत्याने खडी मिश्रित साहित्य टाकून खड्डे बुजविण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र पावसामुळे ही खडी पुन्हा रस्त्यावर वाहून जात असल्याने परिस्थिती आहे तशीच होत आहे.

परिणामी महाराष्ट्र सैनिक मिलिंद मुरारी पांचाळ यांनी मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएला पत्र लिहले आहेत. या पत्रात पांचाळ म्हणतात की, कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या संकटामुळे मार्चपासून लॉक डाऊन आहे. मात्र या  रस्त्यांच्या निविदा आधीच काढल्या असल्याने कामाची गुणवत्ता राखणे हे बांधनकारकच आहे. प्राधिकरणांचे कंत्राटदाराच्या कामावर लक्ष नसते. म्हणूनच मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांना ऊत आला आहे. पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गावर डांबरीकरणाचा पहिल्याच पावसात विचका झाल्याचे आपण पाहिले आहे. याचे नेमके कारण म्हणजे प्रशासनाच्या निविदेच्या अटींचे पालन न करणे, कमीत- कमी वेळात रस्ता बनवला जाणे, डांबराचे तापमान नियंत्रित न करता डांबरीकरण करणे, रोलिंग न करणे यातच अनेक गणितांची सोय केली गेली आहे की काय असे वाटू लागते. आणि हीच बाब अतिशय खेदजनक आहे. आणि  खड्ड्यांमुळे वेळेसाहित लाखो-करोडो रुपयांच्या इंधनाची उधळपट्टी सुरू आहे. हे ठेकेदाराच्या निष्क्रीयतेमुळे होत आहे. परिणामी पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गावरील सुरू असलेल्या किंवा निविदा काढलेल्या रस्त्यांच्या कामाची सखोल चौकशी करून अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

Web Title: Solve problems on the Western Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.