एचएमपीव्ही व्हायरस नव्हे, सोशल मीडियाच अधिक खतरनाक! अफवा न पसरवण्याचे आवाहन

By संतोष आंधळे | Updated: January 8, 2025 06:22 IST2025-01-08T06:21:00+5:302025-01-08T06:22:03+5:30

अशास्त्रीय सल्ल्यापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे

Social media is more dangerous than HMPV virus! Appeal not to spread rumors | एचएमपीव्ही व्हायरस नव्हे, सोशल मीडियाच अधिक खतरनाक! अफवा न पसरवण्याचे आवाहन

एचएमपीव्ही व्हायरस नव्हे, सोशल मीडियाच अधिक खतरनाक! अफवा न पसरवण्याचे आवाहन

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  एचएमपीव्ही विषाणूचे रुग्ण मुंबई व नागपूर येथे सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या, मते हा व्हायरस आपल्यासाठी नवीन नाही. यापूर्वीच आपल्याकडे आढळलेला आहे. या व्हायरसपेक्षा  सोशल मीडियावरील माहिती अधिक धोकादायक आहे. अशा अशास्त्रीय सल्ल्यापासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे.    
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व आरोग्य विभागांना या विषाणूबाबत सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे होणाऱ्या आजारात सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत. त्यावर उपचार उपलब्ध आहेत. 

अफवा पसरवू नका

नागरिकांनी सतर्क राहून चुकीची माहिती पुढे फॉर्वड करू नये. या व्हायरसमुळे होणाऱ्या आजारावरील उपचारांची डॉक्टरांना माहिती आहे. हा कोरोनासारखा नवीन व्हायरस नाही. या आजारावर देशातील काही वैद्यकीय संस्थांनी यावर संशोधन पेपर मेडिकल जर्नलमध्ये यापूर्वीच प्रसिद्ध केलेले आहेत.  

या व्हायरसमध्ये नवीन काही नाही. बाजारात यावरील चाचणी उपलब्ध आहे. आपल्याकडे व्हायरल इन्फेक्शन दरवर्षी विशिष्ट हंगामांत येत असतात. त्यावर आपले डॉक्टर उपलब्ध उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णांना बरे करतात. कोरोनासारखी आरटी पीसीआर चाचणी करून हा व्हायरस आहे की याची तपासणी केली जाते. आपल्याकडे सरकारच्या चांगल्या प्रयोगशाळा आहेत त्या ठिकाणी या चाचण्या करण्याची गरज लागल्या तर त्या केल्या जाऊ शकतात.
- डॉ अमिता जोशी, जे. जे. रुग्णालय

बाधित रुग्णांना आम्ही यापूर्वी अनेकवेळा तपासले आहे. लहाने मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी या काळात थोडी काळजी घेतली पाहिजे. खोकला, सर्दी आणि ताप आला तर तो सुद्धा दोन तीन दिवसांत बरा होतो. लक्षणांनुसार उपचार केले जातात, कोणतीही अशी विशेष उपचार पद्धतीची गरज नाही. काहीवेळ रुग्णांना त्याचा अगदीच जास्त त्रास झाला, तर रुग्णालयात दाखल करावे लागते. जर त्या व्हायरसमध्ये काही जनुकीय बदल झाले. त्याचे पुढे काय होईल हे आताच सांगता येणार नाही.
- डॉ. हर्षद लिमये, साथरोगतज्ज्ञ, नानावटी हॉस्पिटल

हा व्हायरस जुना असल्यामुळे यांच्याविरोधातील लढण्याची प्रतिकारशक्ती आहे. या अशा व्हायरसमुळे होणाऱ्या रुग्णांवर या अगोदरच उपचार केलेले आहेत. रुग्ण उपचार घेऊन व्यवस्थित बरे होतात. आपल्याला या आजारावरील औषधे माहीत आहेत. आरोग्याच्या सुरक्षिततेचे दृष्टीने शासनाने  काही नियम आखून दिले आहेत.
- डॉ. इंदू खोसला, बाल श्वसनविकारतज्ज्ञ, एस.आर.सी.सी. लहान मुलाचे रुग्णालय

Web Title: Social media is more dangerous than HMPV virus! Appeal not to spread rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.