Join us  

'ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या गळ्यात...; अंजली दमानिया यांचे फडणवीसांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 7:51 PM

आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचे ट्विट केले.

 Anjali Damania ( Marathi News ) : मुंबई- आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याचे ट्विट केले. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या असून यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया देत दमानिया या खासदार सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात असल्याचा आरोप केला. दरम्यान, आता अंजली दमानिया यांनी फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिले. 

"आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो. अंजली दमानिया घेत नाहीत.अलीकडच्या काळात दमानिया सुप्रिया सुळेंच्या जास्त संपर्कात आहेत. त्यामुळे त्या अशा प्रकारचे ट्विट करत असतील, असा टोला फडणवीस यांनी दमानिया यांना लगावला होता. यावर आता अंजली दमानिया यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

"ज्यांच्या विरुद्ध लढलो, ज्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या गळ्यात गळे घालायला मी “देवेंद्र फडणवीस“ नाही, अशी टीका दमानिया यांनी फडणवीसांवर केली.

माझी बायको ब्राह्मण, तिच्या बहिणींनाही प्रमाणपत्र देणार का?; आव्हाडांचा थेट सवाल

'मी सुप्रिया सुळेंच्या संपर्कात डोरीन फर्नांडिस च्या विषयाच्या वेळी होते, त्यांना मी तीनदा भेटले, पण ते फर्नांडिस कुटुंबाला घेऊन. त्यांनी देखील राजकारण बाजूला ठेऊन मदत केली त्याबद्दल त्यांचा आदर.  त्या केस मधे तुम्हाला आणि शिंदेना पण भेटले होते. सगळ्याच राजकारणातल्या लोकांच्या संपर्कात तुम्ही लोक असता. आम्ही फक्त लोकांना होईल तेवढी मदत करतो आणि उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार आणि किळस्वाणी राजकारण पाहवत नाही म्हणून लढतो, असंही अंजली दमानिया यांनी पुढं म्हटले आहे. 

अंजली दमानिया या सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असतात

मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत. अलीकडील काळात अंजली दमानिया या सुप्रिया सुळे यांच्या अधिक संपर्कात असतात. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे ट्विट केले असेल. पण छगन भुजबळ त्यांच्या पक्षात आहे, आम्ही आमच्या पक्षात आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, खुद्द छगन भुजबळ यांनीही अंजली दमानिया यांच्या दाव्यावर भाष्य केले. अंजली दमानिया यांना ती माहिती कुठून मिळाली हे माहिती नाही. मात्र भाजपा प्रवेशाचा माझ्यासमोर कोणताही प्रस्ताव नाही. मी राष्ट्रवादी अजित पवार गटात अस्वस्थ असण्याचे कोणतेही कारण नाही. मी घेतलेल्या भूमिकेवर पक्षातील कोणीही टीका केली नाही. स्वत: अजित पवार यांनीही सांगितले की, भुजबळ त्यांच्या समाजाच्या वतीने भूमिका मांडत आहेत. त्यामुळे मी राष्ट्रवादीत का अस्वस्थ असेल? असा प्रतिप्रश्न भुजबळ यांनी विचारला.

टॅग्स :अंजली दमानियादेवेंद्र फडणवीसभाजपाछगन भुजबळ