Join us  

... तर आम्ही राजकारण सोडून देऊ, पवारांवरील टीकेवरुन राष्ट्रवादीचे मोदींना चॅलेंज 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 4:12 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाशिक येथील सभेत मोदींनी आज टिका केली

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पवारसाहेब काय बोलले याचा अभ्यास न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचा आणि खोटा प्रचार करत आहे,त ते किती खोटारडे आहेत हे आज सिद्ध झाले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाशिक येथील सभेत मोदींनी आज टिका केली. त्यावर, बोलताना नवाब मलिक यांनी मोदींना थेट आव्हान दिले आहे. शरद पवार यांना पाकिस्तानचे शासक प्रशासक चांगले वाटतात ही देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. पवारांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट सांगितले होते की, पाकिस्तानमधील राज्यकर्ते आणि सैन्यदल यांची भूमिका भारत विरोधी आहे. तर जनता तशी नाही. परंतु, त्याचा खोटा प्रचार मोदी व फडणवीस करत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. तुमच्याकडे संपुर्ण यंत्रणा आहे. तुम्ही पुर्ण व्हिडिओ बघा, बोलले असतील तर आम्हाला दाखवा. आम्ही राजकारण सोडून देवू आणि तसे नसेल तर पंतप्रधान मोदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. दरम्यान, पाकिस्तानातील शासक प्रशासक आम्हाला चांगले वाटत नाही तर ते मोदींना चांगले वाटतात म्हणून तर ते नवाज शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेले होते. मग इतरांवर आरोप मोदी का करतात, असा सवालही मलिक यांनी केला.

टॅग्स :शरद पवारमुंबईराष्ट्रवादी काँग्रेसनरेंद्र मोदीभाजपा