snake friend died because of negligence | सर्पमित्राचा निष्काळजीपणा जीवावर बेतला
सर्पमित्राचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

मुंबई : शिवडी कोळीवाड्यामध्ये एका घरात बुधवारी सकाळच्या सुमारास नाग आढळून आला. शाहनबाज शेख यांच्या घरी हा नाग शिरला होता. अंदाजे एक फुटाचा नाग होता. सर्पाला पकडताना सर्प मित्र राजू सोलंकी (२०) यांना सर्पदंश झाला. उपचारासाठी केईएम रूग्णालयात दाखल झाल्यावर त्यांना चक्कर आली, त्यात त्यांचा मृत्यु झाला. परंतु नागाला चुकीच्या पद्धतीने हाताळताना एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नागाला हाताळताना निष्काळजीपणा व चमकोगिरीमुळे या सर्पमित्राचा मृत्यू झाल्याचे व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे. राजू सोलंकी यांनी सर्पांना पकडण्याचे प्रशिक्षण घेतले असावे, असे या व्हिडीओमध्ये दिसते. तो कोणत्या ना कोणत्या प्राणीमित्र संस्थेशी जोडलेला असावा. परंतु अशा सर्पमित्रांनी चुकीचे प्रशिक्षण देते कोण? चुकीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था किंवा संघटनेवर कारवाई झाली पाहिजे. जो नाग रेस्क्यू करण्यात आला होता तो गेला कुठे? असा सवाल प्राणीमित्रांनी उपस्थित केला आहे. नागाचा शोध वनविभागाने घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

मानद वन्यजीव रक्षक (मुंबई शहर) सुनिष कुंजू यांनी यासंदर्भात सांगितले की, राजू सोलंकी याची नागाला पकडण्याची पद्धत चुकीची आहे. चमकोगिरी करणाऱ्या सर्पमित्रांना कोणती संस्था आणि संघटना प्रशिक्षण देते, याचा शोध घेऊन कारवाई झाली पाहिजे. एखाद्या सर्पमित्राला सर्पदंश झाल्यावर त्याची माहिती संबंधित संस्थेने आणि संघटनेने वनविभाग आणि डॉक्टरांना दिली पाहिजे. मात्र, राजू सोलंकी याला सर्पदंश झाला याची माहिती कोणत्याही संस्थेने दिली नाही.


Web Title: snake friend died because of negligence
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.