वीज ग्राहकांचे स्मार्ट पाऊल; ऑनलाइन बिल भरण्यास पसंती; २० लाखाहून अधिक व्यवहार ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 13:33 IST2025-12-14T13:33:01+5:302025-12-14T13:33:47+5:30
वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास महावितरणतर्फे प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे.

वीज ग्राहकांचे स्मार्ट पाऊल; ऑनलाइन बिल भरण्यास पसंती; २० लाखाहून अधिक व्यवहार ऑनलाइन
मुंबई: महावितरणच्या भांडुप परिमंडळामध्ये नोव्हेंबर महिन्यात घरगुती, वाणिज्यिक व व्यावसायिक वर्गवारीतील लघुदाब ग्राहकांनी एकूण २० लाख ०९ हजार पेक्षाचे जास्त व्यवहार वीज बिल भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने केले असून, रांग टाळण्यासाठी ग्राहक ऑनलाइन माध्यमांना पसंती देत आहेत.
नोव्हेंबरमध्ये भांडुप परिमंडळातील पेण मंडळात ४ लाख ३१ हजार ९०, ठाणे मंडळात ६ लाख ५१ हजार ५९८, तर वाशी मंडळात सर्वात जास्त ९ लाख २६ हजार ८७८ ऑनलाइन पेमेंट करण्यात आले. रांगेत उभे न राहता ऑनलाइन वीज बिल भरतात, अशा ग्राहकांनी मोठ्या संख्येने प्रॉम्प्ट पेमेंट सवलतीचा लाभ घेतला आहे. वीजबिलाचा ऑनलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के (५०० रुपयांपर्यंत) सूट दिली जाते. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम अॅप, इंटरनेट बैंकिंग, मोबाइल वॉलेट आणि मोबाइल बँकिंगद्वारे महावितरणच्या मोबाइल अॅप किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे ग्राहक सोयीस्करपणे आणि सुरक्षितपणे घरबसल्या वीजबिल भरू शकतात.
... तर १२० रुपयांची मिळणार सवलत
१. वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडल्यास महावितरणतर्फे प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे.
२. यात ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक १२० रुपयांचा फायदा होत आहे. गो ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील १२ महिन्यांची म्हणजे १२० रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे.
संकेतस्थळावर संपूर्ण माहिती उपलब्ध
ऑनलाइन पद्धतीने वीजदेयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून, या पद्धतीस भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतुदी लागू आहेत. ऑनलाइन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्वरित त्याच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे पोहच पावती मिळते. संकेतस्थळावर मागे केलेल्या सर्व पेमेंट तपासल्यास भरणा तपशील व पावती उपलब्ध होते.