झोपलेल्या व्यक्तीचा जेसीबीखाली चिरडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:00 IST2025-03-18T12:59:38+5:302025-03-18T13:00:45+5:30
तक्रारदार ज्ञानेश्वर इंगूलकर (३८) हे जुहू पोलिस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असून, ते १६ मार्च रोजी अंधेरी पश्चिमच्या भरूच्या बाग परिसरात नाकाबंदीसाठी तैनात होते.

प्रतिकात्मक फोटो
मुंबई : जेसीबीच्या चाकाखाली डोके चिरडल्याने रस्त्यावर झोपलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमधून उघडकीस आल्यानंतर जुहू पोलिसांनी याप्रकरणी जेसीबी चालक संतराम पाल तसेच क्लिनर दत्ता शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.
तक्रारदार ज्ञानेश्वर इंगूलकर (३८) हे जुहू पोलिस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत असून, ते १६ मार्च रोजी अंधेरी पश्चिमच्या भरूच्या बाग परिसरात नाकाबंदीसाठी तैनात होते. त्याचवेळी सुनील आराम (२४) नावाच्या व्यक्तीने त्यांना विलेपार्ले पश्चिमच्या गोल्डन टोबॅकोसमोर असलेले एसपी रोडवर एक व्यक्ती जखमी अवस्थेत बेशुद्ध पडल्याचे कळविले. त्यानुसार इंगूलकर घटनास्थळी दाखल झाले आणि अंदाजे ५५ वर्षांचा व्यक्ती त्यांना जखमी अवस्थेत आढळला. त्या व्यक्तीच्या डोक्यावरून अवजड वाहन गेल्याने रक्तस्राव होत होता.
प्रकार सीसीटीव्हीत कैद
इंगूलकर यांनी चौकशी केली. त्यापूर्वी खासगी रुग्णवाहिकेतून कुपर रुग्णालयात त्या व्यक्तीला उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
इंगुलकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. तेव्हा त्यात सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास रस्त्याचे काम करताना रिव्हर्समध्ये निष्काळजीपणाने येणाऱ्या जेसीबीने बॅरिकेट्सच्या मागे झोपलेल्या या व्यक्तीला मागच्या चाकाखाली चिरडल्याचे त्यांना दिसले.
...आणि काढला पळ
जेसीबी चालकास मदत करणारा क्लीनर शिंदेने जखमी व्यक्तीला पाहिल्यानंतर हे दोघे त्याला कोणतीही वैद्यकीय मदत न करता जेसीबी घेऊन पसार झाले.
ते वाहन त्यांनी अंधेरी पश्चिमेतील एम. ए. हायस्कूलच्या बाजूला पार्क केल्याचे पोलिसांना आढळले. त्यानुसार दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.