CoronaVirus News: मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीची एकसष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 02:02 IST2020-07-24T02:02:41+5:302020-07-24T02:02:55+5:30
मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर आता जवळपास एक टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.

CoronaVirus News: मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीची एकसष्टी
मुंबई :कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी गुरुवारी ६१ दिवसांवर पोहोचला आहे. म्हणजेच दोन महिन्यांनंतर मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे.
रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.१४ टक्के एवढा आहे. मुंबईत आतापर्यंत एक लाख पाच हजार ८२९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ७७ हजार १०२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सक्रिय रुग्णांची संख्या २२ हजार ८०० आहे. तसेच आतापर्यंत पाच हजार ९२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दैनंदिन वाढीचा सरासरी दर एक टक्क्याहून खाली आल्यावर कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आला, असे मानले जाते.
मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दैनंदिन दर आता जवळपास एक टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. मे महिन्यात महापालिकेने आठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करीत ‘चेसिंग द व्हायरस’ मोहीम सुरू केली. यामुळे मुंबईतील प्रमुख हॉटस्पॉट असलेले वरळी, धारावी, भायखळा, कुर्ला, वडाळा या विभागांमध्ये कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आला. गेल्या महिन्यात मालाड ते दहिसर या भागात मिशन झिरो मोहीम सुरू करण्यात आली. आता उपनगरातही रुग्णांची संख्या आटोक्यात येत असल्याचा दावा प्रशासन करीत आहे.
रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतील महत्त्वाचे टप्पे
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर २२ मार्च रोजी मुंबईत दुप्पट होण्याचा कालावधी तीन दिवस एवढा होता. पालिकेने सुरू केलेल्या उपाययोजनानंतर हे प्रमाण १५ एप्रिल रोजी पाच दिवसांवर आले. ८ मे रोजी महापालिकेने आठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २० दिवसांवर नेण्याचा निर्धार केला. २ जून रोजी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २० दिवसांवर पोहोचला होता. तर १६ जून रोजी ३० दिवस, २४ जूनला ४१ दिवस, १० जुलै रोजी ५० दिवस आणि २२ जुलै रोजी ६० दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा सर्वात जास्त कालावधी एच पूर्व म्हणजे सांताक्रुझ, खार, वांद्रे पूर्व (१२६ दिवस) आहे.