Join us

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सहा निवासी शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 05:26 IST

धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात संत भगवानबाबा यांच्या नावाने निवासी शाळा उभारण्यात येणार असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितले. पुढच्या तीन महिन्यात महामंडळातर्फे या मजुरांसाठी शिक्षण, आरोग्य आणि इतर सुविधांसाठीच्या योजना जाहीर करणार असून मजुरांच्या हक्कासाठी कायदा तयार करण्याचे काम प्रस्तावित असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

भाजपचे सुरेश धस यांनी या ऊसतोड कामगारांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी चर्चेला उत्तर देताना मुंडे म्हणाले की, राज्य सरकारने ऊस तोडणी मजुरांच्या कल्याणासाठी त्यांच्यासाठी स्थापन झालेल्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला गाळप झालेल्या ऊसाच्या प्रत्येक टनामागे २० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय कालच अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला आहे. यातील १० रुपये कारखान्याकडून तर उर्वरित १० रुपये राज्य सरकार देणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. एका हंगामात अडीच लाख कोटी टन उसाचे गाळप होते. त्यामुळे ऊसतोड मजुरांना भरीव निधी मिळेल, असे मुंडे म्हणाले. माथाडी कामगारांना लागू असलेल्या कायद्याप्रमाणे ऊसतोडणी कामगार व वाहतूकदारांना देखील एका समकक्ष कायद्याचे संरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही मुंडे म्हणाले.

nमागील सरकारच्या काळात ऊसतोड कामगार महामंडळाचे कार्यालय आम्ही दुर्बीण लावून शोधले पण ते सापडले नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून याविषयी विधायक काम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. nराज्यात ऊस उत्पादन होईल तोपर्यंत महामंडळाला आता निधी कमी पडणार नाही अशी व्यवस्था आम्ही केली, त्याचे साधे अभिनंदन करायचा मोठेपणाही विरोधकांनी दाखवला नाही, असा चिमटाही मुंडे यांनी काढला.

टॅग्स :धनंजय मुंडेमहाराष्ट्र