काँग्रेसच्या विधिमंडळातील बैठकीला सहा आमदारांची दांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 09:48 AM2024-02-16T09:48:25+5:302024-02-16T09:49:13+5:30

पक्षानेच गैरहजर राहण्यास सांगितल्याचा दावा

Six MLAs protested at the meeting in the Congress Legislature | काँग्रेसच्या विधिमंडळातील बैठकीला सहा आमदारांची दांडी

काँग्रेसच्या विधिमंडळातील बैठकीला सहा आमदारांची दांडी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपप्रवेश केल्यानंतर आणखी किती आमदार चव्हाणांच्या वाटेने जाणार याचे कयास बांधले जात असतानाच काँग्रेसच्या विधिमंडळात सुरू असलेल्या बैठकीला सहा आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चा रंगल्या आहेत. झिशान सिद्दिकी, अस्लम शेख, अमित देशमुख, मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, माधवराव जवळगावकर हे आमदार बैठकीला अनुपस्थित होते. बैठकीनंतर हे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. परंतु, या आमदारांना गैरहजर राहण्यास पक्षानेच सांगितले होते, असे स्पष्टीकरण काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले. 

विधिमंडळातील या बैठकीला ३६ आमदार उपस्थित होते. तर सहा आमदार अनुपस्थित होते. बैठकीविषयीची माहिती देताना बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना सांगितले की, २० फेब्रुवारी मराठा आरक्षणासाठी बोलाविण्यात आलेले विशेष अधिवेशन तसेच २६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत या बैठकीत चर्चा झाली. 

चिंता नको, राज्यसभा जिंकू...
राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक सदस्यसंख्या आमच्याकडे आहे. सोबत मित्रपक्ष सदस्यदेखील आहेत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. आमचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

Web Title: Six MLAs protested at the meeting in the Congress Legislature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.