लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी भाजप आमदार सुरेश धसही त्यांच्याबरोबर होते.
परळीत २१ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली होती. या प्रकरणी वाल्मीक कराड व त्याचा मुलगा सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितले की, गेल्या २१ महिन्यांचा वृत्तांत मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला आहे. हे ऐकून मुख्यमंत्री भावुक झाले. या प्रकरणात कुणीही असले तरी त्याला सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमली आणि आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ बीडच्या पोलिस अधीक्षकांना फोन लावला व कारवाईचे आदेश दिले. अमरावतीचे अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या एसआयटीत पोलिस निरीक्षक साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सपकाळ यांचा समावेश आहे.
बंगल्यावरून फोन आला अन्...
पोलिस प्रशासनाला परळीतील बंगल्यावरून फोन आला आणि त्यांनी तपास थांबवला, अशी माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली. तो फोन धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून वाल्मीक कराडने केला. यामध्ये अजून कुणी आहे का याचा सीडीआर काढण्याची विनंती आम्ही केली. या हत्येमध्ये ज्या लोकांचा सहभाग आहे त्यांची नावे आपण मुख्यमंत्र्यांना दिली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
‘हत्येत पोलिसही सहभागी’
महादेव मुंडे हत्या प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा आरोप आ. सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना केला. या हत्येत शंभर टक्के काही पोलिस अधिकारी सहभागी आहेत, त्यांची नावे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली आहेत. या पोलिसांचे फोन आणि कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी आम्ही केली आहे, असे धस यांनी सांगितले.