रिक्षा-टॅक्सी प्रवाशांसाठी टोल फ्री क्रमांक; फेरीवाल्यांविरुद्ध तक्रारींसाठी व्हॉट्सॲप नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 10:46 AM2023-11-03T10:46:05+5:302023-11-03T11:43:32+5:30

कोणत्या क्रमांकावर कराल तुमची तक्रार, जाणून घ्या सविस्तर

Single toll free number for rickshaw, taxi passengers; WhatsApp number for complaints against hawkers | रिक्षा-टॅक्सी प्रवाशांसाठी टोल फ्री क्रमांक; फेरीवाल्यांविरुद्ध तक्रारींसाठी व्हॉट्सॲप नंबर

रिक्षा-टॅक्सी प्रवाशांसाठी टोल फ्री क्रमांक; फेरीवाल्यांविरुद्ध तक्रारींसाठी व्हॉट्सॲप नंबर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भाडे नाकारणे, उद्धट वर्तन करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे इत्यादींमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून प्रवासी त्रस्त असतात. अनेकदा तक्रार कुठे करावी, हे समजत नाही. या पार्श्वभूमीवर तक्रारींसाठी मुंबई परिवहन कार्यालयांचे वेगवेगळे क्रमांक उपलब्ध करण्यात आले होते. मात्र, त्यामुळेही प्रवाशांची अडचण होत होती. परंतु आता लवकरच मुंबईत एकच टोल फ्री क्रमांक तयार केला जाणार आहे.

टॅक्सी, रिक्षा चालकांच्या गैरवर्तनाला लगाम लावण्यासाठी ताडदेव आरटीओने अधिकाऱ्यांचे विशेष मदत पथक निर्माण केले होते. त्यानंतर वडाळा, अंधेरी  आणि बोरीवली आरटीओनेही मदत पथक तयार केले होते.  परंतु चार आरटीओ कार्यालयांचे चार वेगवेगळ्या क्रमांकांमुळे प्रवाशांचा गोंधळ होत होता. या पार्श्वभूमीवर एकच क्रमांक असावा, अशी मागणी होती. त्यामुळे टोल फ्री क्रमांकाची निर्मिती केली जाणार आहे. टोल फ्री क्रमांकामुळे गोंधळ टाळण्यास मदत होणार आहे. 

प्रस्ताव तयार

प्रवाशांच्या सोयीसाठी एक टोल फ्री क्रमांक तयार करण्यात आला आहे. या क्रमांकावर प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर संबंधित आरटीओला ती तक्रार वर्ग केली जाईल, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

फेरीवाल्यांविरुद्ध तक्रारींसाठी व्हॉट्सॲप क्रमांक

रेल्वे परिसर असो किंवा लोकल सर्रासपणे फेरीवाल्यांचा वावर असतो. अनधिकृत फेरीवाले आणि तिकीट दलालांना लगाम लावण्यासाठी मध्य रेल्वेने आता पुढाकार घेतला आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या तक्रारी करिता ९००४४४२७३३ हा व्हॉट्सॲप मोबाइल क्रमांक सुरू केला आहे. अनधिकृत फेरीवाले आढळल्यास संबंधिताचे फोटो व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. तसेच रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती संबंधित रेल्वेकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहनही मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

Web Title: Single toll free number for rickshaw, taxi passengers; WhatsApp number for complaints against hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.