“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 16:54 IST2025-12-25T16:53:38+5:302025-12-25T16:54:09+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक झाली.

“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी करण्याचे निर्णय स्थानिक नेतृत्वांकडे दिले होते तसेच अधिकार वंचितनेही दिले होते. वंचित व काँग्रेसची आघाडी व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा चांगला संवाद आणि प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक झाली. प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धवन सपकाळ म्हणाले की, महानगरपालिकेच्या निवडणुका १५ तारखेला जाहीर झाल्या आणि त्यावेळसच नियोजनासाठी काँग्रेस पक्षाची बैठक झाली होती, निवडणूक व्यवस्थापन व उमेदवार निश्चित करण्यासाठी यावेळी रणनिती ठरवली होती. २८ महानगरपालिकांसाठी राज्य निवड मंडळाची बैठक पार पडली, जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या शिफारसी लक्षात घेऊन पक्ष पातळीवर एक महत्वाचा टप्पा आज पार पडला आहे. सोशल इंजिनिअरिंग लक्षात घेऊन तिकिट वाटपाची चर्चा करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करत आहेत
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचा घटक पक्ष नात्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. संघटनेच्या नेत्यांना तशा सूचना दिल्या आहेत, याशिवाय कोणत्याही पक्षाचा आघाडीसाठी प्रस्ताव आलेला नाही, तसा प्रस्ताव आला तर विचार केला जाईल. एका प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, मुंबई महापालिकेतील आघाडीच्या चर्चेचा मी भाग नाही. पण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यु. बी. व्यंकेटश वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा करत आहेत, यासाठी तिघांकडे पक्षाने संवादाची जबाबदारी सोपवलेली आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
दरम्यान, राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून नगरपालिका निवडणुकाप्रमाणेच या निवडणुकीतही समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतेच सांगितले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली.