Join us

शरद पवार यांच्या मान्यतेनेच राष्ट्रवादी आमदारांच्या सह्या ; फडणवीस यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 05:42 IST

२०१९मध्येही त्यांची तयारी होती

मुंबई : राष्ट्रवादीचे जे आमदार भाजपसोबत आले त्यांनी शरद पवार यांच्या मान्यतेनेच त्यासाठी सह्या केल्या असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.

 या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा संदर्भ दिला. पवार साहेबांच्या मान्यतेनेच राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत गेले असे अजित पवार यांनीच याआधी स्पष्ट केले आहे, असे फडणवीस म्हणाले.

 चौकशी एजन्सींच्या कारवाईच्या भीतीमुळे भाजपसोबत जावे लागत असल्याचे आपल्या पक्षातील काही नेत्यांनी आपल्याला सांगितले होते असा दावा शरद पवार यांनी बुधवारी एका मुलाखतीत केला होता. त्यावर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली.

 काही लोक चौकशीला घाबरून भाजपसोबत गेले असे शरद पवार म्हणत असतील तर २०१९ ला शरद पवार यांनी आमच्याशी सरकार स्थापनेबाबत भाजपशी चर्चा केली होती. ते आमच्यासोबत यायला तयार होते.

कोणत्या चौकशी संस्थांना घाबरून ते आमच्यासोबत यायला तेव्हा तयार झाले होते का? आपल्या पक्षातील लोक बाहेर का पडले हे पवार यांना चांगले ठाऊक आहे, असेही फडणवीस म्हणाले.

२०१७ला सुध्दा पवार सोबत येणार होते

२०१७ मध्ये देखील शरद पवार यांनी आमच्याशी सरकार स्थापनेसाठी चर्चा केली होती. तेव्हा ते कोणत्या एजन्सीला घाबरले होते का? असा सवाल फडणवीस यांनी यावेळी केला.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाशरद पवार