Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराज लढाईच्या मैदानात; काडसिद्धेश्वर महाराजांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 15:55 IST

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने १२ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.

मुंबई/कोल्हापूर - आगामी लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून भाजपाने २३ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर, काँग्रेसकडूनही १२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, काँग्रेसने कोल्हापूरमधूनशाहू महाराज छत्रपतींना तिकीट दिले आहे. त्यामुळे, कोल्हापुरातील शिवछत्रतींच्या गादीचा मान असलेल्या शाहू छत्रपतींनी भाजपाविरुद्ध लढाई लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने काडसिद्धेश्वर महाराजांची भेट घेतली. तसेच, आपल्या शुभेच्छा माझ्या पाठिशी राहू द्या, असेही शाहूंनी म्हटले. त्यामुळे, शाहू महाराजांनी प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. 

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने १२ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. मात्र, कोल्हापुरमधून अद्यापही उमेदवार देण्यात आला नाही. त्यामुळे, कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांविरुद्ध कोण उमेदवार असणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली. आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शाहू महाराजांनी पत्रकार परिषद घेत राजकीय वातावरण खराब झाल्याची खंत बोलून दाखवली. राज्यात गेल्या ६० वर्षांत जी नव्हती तशी अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्याची टीकाही त्यांनी केली. 

जनतेच्या आग्रहास्तव मी तुमच्यासमोर आहे. आपल्या महाराष्ट्राला, कोल्हापूरला मोठा इतिहास आहे. शिवाजी महाराज यांनी अन्यायाविरुद्ध दिलेला लढा महत्वाचा आहे. आधुनिक काळात छत्रपती शाहू महाराज यांचे समतेच कार्य आपण पाहतोय. हाच विचार जनतेमध्ये आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचा प्रभाव माझ्यावर आहे, तोच विचार पुढे घेऊन जाणार आहे. विकासाला गती देणे, त्याला दिशा देणे यासाठी आपला प्रयत्न आहे, असे  शाहू महाराज यांनी म्हटले होते. त्यानुसार आता शाहू महाराजांनी थेट प्रचाराच्या मैदानात उतरुन लढाईला सुरुवात केली आहे. 

श्रीमंत शाहू महाराज यांनी आज कणेरी येथील कणेरी मठाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी मठाचे प्रमुख काडसिद्धेश्वर स्वामी यांची भेट घेतली. मठातर्फे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी शाहू महाराजांचा सत्कार केला. तर,''आपल्या शुभेच्छा माझ्या पाठीशी राहू द्या'', अशा भावना शाहू महाराजांनी व्यक्त केल्या. मठावर आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित लोकांना त्यांनी नमस्कार केला. तेव्हा उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात शाहू महाराजांचे स्वागत केले. 

दरम्यान, कोल्हापूरमधील कणेरी मठ हे काडसिद्धेश्वर महाराजांचे पवित्र स्थान आहे. जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनही येथे भाविक व पर्यटक येत असतात. कणेरी मठ हे चांगले पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे. तर, कोल्हापूर नगरीचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळेच, शाहू महाराजांनी या मठात जाऊन आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केल्याचं दिसून येत आहे.  

टॅग्स :कोल्हापूरशाहू महाराज छत्रपतीलोकसभा निवडणूक २०२४