मोतीलालनगर पुनर्विकासाच्या प्रारंभिक कामाचा अखेर श्रीगणेशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:02 IST2025-10-09T11:02:11+5:302025-10-09T11:02:24+5:30
मोकळ्या जागांवर आधी बांधकाम : म्हाडाच्या आराखडा मंजुरीनंतर तपशील रहिवाशांपुढे मांडणार

मोतीलालनगर पुनर्विकासाच्या प्रारंभिक कामाचा अखेर श्रीगणेशा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर १, २ व ३ च्या पुनर्विकास प्रकल्पाच्या प्रारंभिक कामाला गेल्या दोन आठवड्यांपासून सुरुवात झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी १४३ एकरवरील हा मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प आहे. योजनेनुसार, वसाहतीतील मोकळ्या जागांवर आधी बांधकाम करण्यात येणार आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना प्रकल्पाच्या बांधकाम आराखड्याबद्दल सांगितले, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आराखडा सादर होऊन म्हाडाने मंजूर केल्यानंतर प्रकल्पाचे तपशील रहिवाशांपुढे मांडले जातील.
बांधकामातील पहिला टप्पा म्हणजे माती परीक्षणास मोतीलाल नगरमध्ये प्रारंभ केला असल्याचे म्हाडामधील एका अधिकाऱ्याने सांगितले. १९६० च्या दशकात विस्थापित प्रकल्पग्रस्तांना घरे देण्यासाठी बांधलेल्या मोतीलाल नगर वसाहतीकडे दुर्लक्ष झाल्याने वसाहतीची अवस्था गंभीर झाली.
मूलभूत सोयी-सुविधांचाही बोजवारा उडाला. म्हाडाने २०१३ साली पुनर्विकासासाठी प्रयत्न सुरू केले. यावर्षी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली. आवश्यक कायदेशीर मान्यता मिळाल्या.
विशेष प्रकल्प दर्जा
मोतीलाल नगरचा पुनर्विकास ५.८ लाख चौरस मीटर क्षेत्रात होईल.
गृहनिर्माण संस्थेला एकूण ३.८३ लाख चौरस मीटर बांधकाम क्षेत्र मिळणार आहे.
सात वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल. सरकारने पुनर्विकास प्रकल्पाला विशेष प्रकल्प दर्जा दिला आहे.
अदानी प्राॅपर्टीजची बाजी
११ मार्च : अदानी प्रॉपर्टीजने म्हाडाच्या निविदेमध्ये ३६,००० कोटींची बोली लावत प्रकल्पात बाजी मारली.
जुलै : म्हाडा आणि अदानी रिॲल्टी यांदरम्यान करार झाला व अदाणी रिॲल्टी यांची बांधकाम व विकास संस्था अर्थात, सी अँड डीए म्हणून नेमणूक झाली.
सर्वाधिक क्षेत्रफळाचे घर प्रकल्पात मिळणार
मुंबईत सी अँड डीए तत्वावर राबवल्या जात असलेल्या प्रकल्पांपैकी मोतीलाल नगरमध्ये आजवरचे सर्वाधिक क्षेत्रफळाचे घर देण्यात आले आहे. मोतीलाल नगर वसाहतीतील विद्यमान घरांच्या क्षेत्रफळापेक्षा हे कित्येक पटींनी मोठे घर असणार आहे, म्हाडाच्या अनेक प्रकल्पांचे व्यवस्थापन सल्लागार निखील दीक्षित यांनी सांगितले.