Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस भरतीत 'शॉर्टकट', पवई पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल; वेळ कमी दाखवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:03 IST

पहिल्या प्रकारात डिटेल क्रमांक १११ मधील उमेदवार ओमकार पवार (रा. नाशिक) याने तिसऱ्या फेरीदरम्यान शॉर्टकट घेतल्याचे आढळले.

मुंबई : पोलिस भरतीवेळी १,६०० मीटर धावण्याच्या शर्यतीत शॉर्टकट मारून वेळ कमी दाखविण्याचा प्रकार अंधेरी पूर्वेतील मरोळ पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौघांवर पवई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

ओमकार पवार, सुयश खांडे, ओमकार वांजुळ आणि सागर टिळे अशी या चौघांची नावे आहेत. राज्य पोलिस भरती २०२४-२०२५ अंतर्गत शारीरिक चाचणीदरम्यान काही उमेदवारांनी प्रत्येकी ४०० मीटरच्या चार पूर्ण फेऱ्या न मारता, ट्रॅकच्या बाहेर जाऊन पुन्हा आत येत 'चीप स्कॅन' करून वेळ पूर्ण केल्याचे भासविल्याचे सीसीटीव्ही तपासात उघड झाले. 

पहिल्या प्रकारात डिटेल क्रमांक १११ मधील उमेदवार ओमकार पवार (रा. नाशिक) याने तिसऱ्या फेरीदरम्यान शॉर्टकट घेतल्याचे आढळले. त्याने चार फेऱ्या मारणे अपेक्षित होते. मात्र, फक्त तीनच फेऱ्या मारल्या आणि नेट टाइम कमी दाखवला. अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही तपासला तो ट्रॅक बाहेर जाऊन पुन्हा प्रवेश करताना दिसला.

ट्रॅक सोडून पुन्हा केला प्रवेश

दुसऱ्या प्रकारात डिटेल क्रमांक १४६ मधील उमेदवार सुयश खांडे (रा. मुंबई) याने चौथ्या फेरीत शॉर्टकट घेतल्याचे निष्पन्न झाले. त्याचाही नेट टाइम अनपेक्षितरीत्या कमी होता. त्याने ट्रॅक सोडून पुन्हा प्रवेश करीत 'चीप स्कॅन' करून वेळ कमी दाखविल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

फसवणूक करणाऱ्या उमेदवारांविरोधात सरकारची फसवणूक व दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सीसीटीव्ही व इलेक्ट्रॉनिक टाइमिंग प्रणालीची मदत घेतली जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दोघांकडून संगनमताने गैरव्यवहार

१०० मीटर धावण्याची चाचणी सुरू असताना नाशिकच्या ओमकार वांजुळ आणि सागर टिळे या दोन उमेदवारांनी संगनमत करून गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारीनुसार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

ओमकार याने सागरच्या ऐवजी १०० मीटर धाव पूर्ण करून त्याला १५ पैकी १० गुण मिळवून दिल्याचे, तसेच सागर याने स्वतःची धाव पूर्ण न करता शासनाची फसवणूक केल्याचे दिसले. त्यानुसार, दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Police recruitment 'shortcut': Four booked in Powai for cheating on race.

Web Summary : Four individuals were booked for cheating during police recruitment in Mumbai. They allegedly used shortcuts in the 1600-meter race and colluded in the 100-meter sprint, manipulating times to gain an unfair advantage. CCTV footage exposed the fraudulent activities.
टॅग्स :मुंबई पोलीसपोलिसगुन्हेगारी