दिवाळीची खरेदी ऑनलाइन करताय? या गोष्टींची काळजी घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 01:43 PM2023-11-04T13:43:49+5:302023-11-04T13:46:45+5:30

अनोळखी लिंकवर क्लिक करू नका; सायबर पोलिसांचे आवाहन

Shopping online for Diwali? Take care of these things | दिवाळीची खरेदी ऑनलाइन करताय? या गोष्टींची काळजी घ्या

दिवाळीची खरेदी ऑनलाइन करताय? या गोष्टींची काळजी घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिवाळीसह विविध सणांंच्या काळात ऑनलाइन भामटेही सक्रिय झाल्याचे पाहावयास मिळत आहे. विविध फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली एक लिंक पाठवून तुमच्या खात्यावर ऑनलाइन डल्ला मारत आहे. त्यामुळे अशा कुठल्याही मधाळ आमिषाला बळी न पडता, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

या सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे मिळवतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. अशा आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन राज्याच्या सायबर विभागाने केले आहे.

सायबर तक्रारीसाठी येथे करा संपर्क
तुम्हीही सायबर ठगांच्या जाळ्यात अडकलात तर तत्काळ १९३० या सायबर पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात येत आहे.

बळी पडू नका
गणेशोत्सव, नवरात्र पाठोपाठ दिवाळी अशा विविध सणांंच्या निमित्ताने विविध ऑफरचे आमिष दाखवत सायबर ठग फसवणूक करत आहेत. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. संकेतस्थळावरूनच व्यवहार करा असे सायबर पोलिसांकड़ून सांगण्यात येत आहे.

अशी होते फसवणूक
फेसबुकसह विविध सोशल मीडियावरून विविध जाहिरातींच्या आड़ून ठग मंडळी नागरिकांना स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून गंडा घालतात. तर दुसरीकडे बनावट प्रोफाइलवरून आधी ओळख करायची. पुढे ओळखीतून प्रेमात रूपांतर होताच संबंधित व्यक्तीची गोपनीय माहिती मिळवून फसवणूक होत असल्याच्या घटनाही वाढत आहेत. पुढे गोपनीय माहिती, अश्लील फोटो शेअर करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी होते.

तर साधा पोलिसांशी संपर्क
  खात्यातून पैसे गेल्याचे समजताच तासाभराच्या आत संपर्क साधल्यास पैसे वाचण्याची शक्यता जास्त असते. 
  सायबर सेलच्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, फसवणुकीमध्ये तीन टप्प्यात काम चालते. 
  सध्या फसवणुकीची रक्कम खात्यात जमा होताच, त्याच वेळेत दुसरीकडे काढण्यास सुरुवात होते. 
  तर काही प्रकरणात विविध शॉपिंग संकेतस्थळावर खरेदीसाठी पैसे अडकवले जात असल्याचे आतापर्यंतच्या कारवाईतून दिसून येत आहे. 
  अनेकदा पैसे काढण्यासाठी असलेली लिमिट, ऑनलाइन ट्रान्सफर प्रक्रियेमुळे पैसे काढण्यास वेळ जातो. 
  यापूर्वीच तक्रारदार पोलिस ठाण्यास आल्यास तत्काळ तांत्रिक पुराव्याच्या मदतीने  संबंधित बँकेशी संपर्क साधून पैसे वाचविण्यास मदत होते.

Web Title: Shopping online for Diwali? Take care of these things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.