"मुंबईतल्या बिल्डरांची यादी तयार करा"; अनमोल बिश्नोईला सुरु करायचे होतं खंडणी रॅकेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:00 IST2025-01-07T16:59:39+5:302025-01-07T17:00:00+5:30
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केल्यानंतर बिश्नोई टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

"मुंबईतल्या बिल्डरांची यादी तयार करा"; अनमोल बिश्नोईला सुरु करायचे होतं खंडणी रॅकेट
Bishnoi Gang: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. ४५९० पानांच्या आरोपपत्रात मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यासह २६ जणांचा उल्लेख करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बिष्णोई टोळीने बाबा सिद्दीकीची सलमान खानशी जवळीक असल्याने त्याची हत्या केल्याचा खुलासा पोलिसांनी चार्जशीटमध्ये केला आहे. अशातच सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार आणि बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे असणारी बिश्नोई टोळी मुंबईवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलत असल्याचे गुन्हे शाखेने म्हटलं आहे.
मुंबईत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बिष्णोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची योजना आखल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दुसरीकडे, अनमोल बिश्नोई याने त्याच्या एका साथीदाराला मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांसंदर्भात माहिती गोळा करण्यासा सांगितले होते, असे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला आढळून आले आहे. आतापर्यंत ही टोळी उत्तर भारतातील राज्यांमध्ये खंडणी गोळा करत होती. मात्र आता बिश्नोई टोळीने मुंबईत खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात उघड झालं आहे.
“एका आरोपीने आम्हाला सांगितले की अनमोलने त्याला बिल्डर्सचे नंबर गोळा करण्यास सांगितले होते ज्यांना ते धमकावू शकतात आणि खंडणीचे पैसे देण्यास सांगू शकतात. सलमान आणि इतरांना टार्गेट करण्यामागचे कारण म्हणजे शहरात भीती निर्माण करणे, ज्याचा वापर करून ते खंडणीच्या कारवाया करू शकतील,” असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, अद्यापपर्यंत खंडणीचा फोन आला असल्याची कोणतीही तक्रार आमच्याकडे आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये बिश्नोई टोळी सक्रिय आहे. दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि रवी पुजारी यांच्या नेतृत्वाखालील अंडरवर्ल्ड टोळ्यांनंतर आता बिश्नोई टोळी मुंबई पाय रोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे.
अनमोल बिश्नोईला नोव्हेंबरमध्ये यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंटने ताब्यात घेतले होते. त्याने बनावट पासपोर्ट वापरून प्रवास करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. अनमोलवरील कारवाईवरुन टोळीला मोठा धक्का होता. अनमोल सध्या आयोवा येथील पोट्टावाट्टामी काउंटी जेलमध्ये बंद आहे. त्यामुळे आता दोन्ही भाऊ तुरुंगात आहेत. ही टोळी आता रोहित गोदरा चालवत आहे. पोलिसांनच्या म्हणण्यांनुसार अनेक सदस्य अटकेत असल्याने, बिश्नोई टोळी कमजोर पडण्याची शक्यता आहे.