Join us

महिला पोलिसाने मेसेज दाखवला आणि...; मुंबईतून बाहेर पडताना अमोल कोल्हेंना धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 13:53 IST

अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर मुंबईतून बाहेर पडताना एक व्हिडिओ शेअर सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : राज्य सरकारने प्रत्येक चौकात वसुलीसाठी वाहतूक पोलिसांना टार्गेट दिल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. मुंबईतून बाहेर पडताना एका सिग्नलवर या टार्गेटबाबतचा मेसेज आपल्याला एका महिला वाहतूक पोलिसानेच दाखवल्याचा दावाही अमोल कोल्हे यांनी केली आहे. खासदार कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर हे आरोप केले आहेत.

सिग्नलवर आलेला अनुभव सांगताना अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे की, "मुंबईतून बाहेर पडताना एका सिग्नलवर वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी माझी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाइन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः हा काय प्रकार आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाहतूक शाखेच्या त्या भगिनीने थेट मोबाइलवरील मेसेज दाखवला. प्रत्येक चौकात २५ हजार रुपयांची वसुली व्हावी आणि २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे, असा उल्लेख त्या मेसेजमध्ये होता," असा दावा कोल्हे यांनी केला आहे. मंत्र्यांनी खुलासा करण्याची मागणी

वसुलीच्या मेसेजबद्दल संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी अमोल कोल्हेंनी केली आहे. "मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत. २५ ,००० × ६५२ = १, ६३, ००, ०००  प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १. ६३ कोटी रुपये...इतर शहरांचं काय? संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल," असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. 

दरम्यान, वाहतूक खात्याविषयी आपला अनुभव सांगताना अमोल कोल्हे यांनी सरकारचा 'ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली' असाही उल्लेख केला आहे. 

टॅग्स :वाहतूक पोलीसराष्ट्रवादी काँग्रेसमुंबई