शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे कलादालन संयुक्त महाराष्ट्र कलादालनात उभारा, भाजपाची महापौरांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 05:17 PM2021-11-21T17:17:22+5:302021-11-21T17:18:43+5:30

Shivshahir Babasaheb Purandare : शिवशाहिरांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाचे कलादालन बाळासाहेबांनी बांधलेल्या कलादालनातील पहिल्या मजल्यावर उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपा नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून केली आहे.

Shivshahir Babasaheb Purandare's Art Gallery to be set up in United Maharashtra Art Gallery, BJP demands mayor | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे कलादालन संयुक्त महाराष्ट्र कलादालनात उभारा, भाजपाची महापौरांकडे मागणी 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे कलादालन संयुक्त महाराष्ट्र कलादालनात उभारा, भाजपाची महापौरांकडे मागणी 

Next

मुंबई - बाळासाहेब ठाकरे ज्या ऋषीतुल्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना वंदनीय मानत होते. त्याच शिवशाहिरांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाचे कलादालन बाळासाहेबांनी बांधलेल्या कलादालनातील पहिल्या मजल्यावर उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपा नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून केली आहे. असा निर्णय घेतल्यास त्यामुळे बाळासाहेब आणि शिवशाहीर बाबासाहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक पर्यटकांचा इथे ओघ वाढणारच. असे झाल्यास हा स्व.बाळासाहेबांच्या दूरदृष्टीचा व भावनेचा मान असेल तर स्व.शिवशाहीर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा सन्मान असेल, असे या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक स्मृती जागवणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची निर्मिती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे तब्बल ११ वर्षांपूर्वी करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढाकार घेऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात व्हावा, यासाठी या कलादालनाची निर्मिती महापालिकेच्या माध्यमातून केली.

कलादालनाच्या तळ घरात संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधी छायाचित्रे, शिल्पचित्रे आणि माहिती फलक आहेत. तर तळ मजल्यावर या चळवळीत सहभागी असलेल्या नेत्यांची तैलचित्रे आहेत. तसेच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं, प्राचिन संस्कृतीचं, भौगोलिक समृद्धतेचं दर्शन घडवण्यावसाठी विविध कलात्मक बाबी येथे आहे.  या कलादालनातील पहिल्या मजल्यावर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टिपलेल्या गड किल्ल्यांच्या विहंगम छायाचित्र प्रदर्शनाच्या जागेत बाबासाहेब यांचे कलादालन उभारावे. इथे  शिवशाहीर बाबासाहेबांनी निर्माण केलेले शिवचरित्र, त्यावर आधारित साहित्य,  छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्र आदींचे प्रदर्शीत करण्यात यावे. हीच शिवशाहीर बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. 

येथील गड किल्ल्यांची छायाचित्रे आणि बाबासाहेबांनी सांगितलेली गडकिल्ल्यांची महती यांचा सुरेख मिलाफ या कलादालनात पाहायला मिळेल. तसेच शिवशाहीर बाबासाहेबांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आशीर्वाद लाभला होता, त्यामुळे सावरकर स्मारक शेजारी ही वास्तू असल्याने त्यांच्या नावाने कलादालन उभारण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरी जागा  योग्य असू शकत नाही.

बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी केली, त्या कलादालनात पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतील असे आम्हाला वाटते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र कालादालनाच्या पहिल्या मजल्यावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन उभारण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेतला जावा, ही विनंती, असे प्रभाकर शिंदे यांनी या पत्रात म्हटले आहे. 

Web Title: Shivshahir Babasaheb Purandare's Art Gallery to be set up in United Maharashtra Art Gallery, BJP demands mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.