Join us

आर्थर राेड जेलमध्ये संजय राऊतांचा मुक्काम; औषधे अन् घरचे जेवण मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 06:16 IST

राऊत यांची ईडी कोठडी ८ ऑगस्टला समाप्त झाली. ईडीने सोमवारी राऊत यांना विशेष न्यायालयात उपस्थित केले.

मुंबई : पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी ईडी कोठडीत असलेले शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राऊत यांना औषधे आणि घरचे जेवण देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. 

राऊत यांची ईडी कोठडी ८ ऑगस्टला समाप्त झाली. ईडीने सोमवारी राऊत यांना विशेष न्यायालयात उपस्थित केले. राऊत यांच्या अतिरिक्त कोठडीची आवश्यकता नसल्याचे ईडीतर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी राऊत यांची प्रकृती विचारात घेत त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

राऊत यांना डॉक्टरांनी सुचविल्याप्रमाणे औषधे देण्यात यावीत तसेच घरचे जेवण दिले जावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहारप्रकरणी ईडीने राऊत यांना ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली. याच प्रकरणात राऊत यांच्या पत्नी वर्षा यांचीही ईडीने अलीकडेच दहा तास चौकशी केली.

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालयशिवसेना