Join us

'संजय राऊत ४ वर्ष जेलमध्ये राहतील'; शिंदे गटातील आमदाराचा दावा, चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:19 IST

कर्माची ही फळे आहेत, अशी टीका संजय शिरसाठ यांनी केली. 

मुंबई- मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत असून त्यांची अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. 

संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच संजय राऊतांच्या नातेवाईकांना यावेळी धीर देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला. मात्र संजय राऊतांच्या घरी उद्धव ठाकरे गेले,पण यापूर्वी अडसूळ, सरनाईक यांच्या घरी का गेले नाही? असा सवाल शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांनी उपस्थित केला. 

संजय राऊतांवर जी कारवाई सुरू आहे ती मागील ४-५ महिन्यांपासून सुरू आहे. त्यांना ईडीने अनेकदा नोटीस पाठवली. काही नोटिसींना ते गैरहजर राहिले. ईडीने कायदेशीर प्रक्रियेतून ही कारवाई केली, असं संजय शिरसाठ यांनी सांगितलं. तसेच  संजय राऊतांना त्यांची लायकी आज कळेल. ज्यांच्या नादी लागून संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्या कर्माची ही फळे आहेत, अशी टीका संजय शिरसाठ यांनी केली. 

संजय राऊतांनी शिवसेनेला फसवलं. उद्धव ठाकरेंना फसवलं आणि बाळसाहेबांना फसवलं. त्यांनी बाळासाहेबांच्या शपथा घेऊन शिवसैनिकांना फसवलं. त्याचं वाईट वाटतं. त्यांनी आपल्या सर्वांचं घर फोडलंय, असं संजय शिरसाठ म्हणाले. त्याचप्रमाणे संजय राऊत चार वर्ष जेलमध्ये राहतील. ते लवकर बाहेर येणार नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे भेटीसाठी गेले होते, असा दावाही संजय शिरसाठ यांनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊतांच्या अटकेनंतर त्यांचे भाऊ आमदार सुनिल राऊत यांनी पत्रा चाळ आणि संजय राऊतांचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगितले. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केलं आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली. त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचं काम करेल आम्ही आमचं काम करु, असं सुनील राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालयसंजय शिरसाट