Join us

Shivsena: बहुमत चाचणीसाठी तरी सोडा, देशमुख अन् नवाब मलिकही सर्वोच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 13:36 IST

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली

मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. मात्र, शिवसेनेने विधीमंडळातील बहुमत चाचणी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली. दुसरीकडे तुरुंगात असलेले माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनीही सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे.   

देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा केल्यानंतर रात्री मुंबईत राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर, आता मनी लाँड्रिगप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बहुमत चाचणीत मतदान करण्यासाठी सोडण्यात यावे, अशी मागणी मलिक आणि देशमुख यांनी केली आहे. आज सायंकाळी 5.30 वाजता त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याचवेळेस, शिवसेनेनंही बहुमत चाचणीच्या निर्णयाला आव्हान दिल्याची याचिका सुनावणीत असेल. दरम्यान, यापूर्वीही आमदार मलिक आणि देशमुख यांनी राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत मतदानचा हक्क बजावण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ही परवानगी नाकारली होती.

  

दरम्यान, राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे बहुमत चाचणीच्या हालचाली सुरू असून शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत येणार आहेत. तर, भाजपनेही अपक्षांसह सर्वच आमदारांना मुंबईत येण्याचे निरोप पाठवले आहेत. त्यापैक, अनेक आमदार आज मुंबईत आले असून आमदारांची सोय ताज हॉटेलमध्ये करण्यात आल्याची माहिती आहे.  

टॅग्स :अनिल देशमुखशिवसेनानवाब मलिकसर्वोच्च न्यायालय