Join us

Shivsena: संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीनंतर शिंदे गटाची बोचरी टिका, 'शिल्लक सेना' म्हणत साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 21:45 IST

Shivsena: शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनीही आता शिवसेनेवर शिल्लकसेना म्हणत टिका केली आहे.

मुंबई - जातपातीचं राजकारण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिल्लक सेनेने केलेली युती ही सर्वसामान्य शिवसैनिकासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचं मत शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केलं आहे. संभाजी ब्रिगेड ही नक्की कुणाची बी टीम आहे हे माहीत असूनही ही युती करणं हे अनाकलनीय असल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांसमेवत पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. त्यानंतर, इतर पक्षांकडून प्रतिक्रिया येत आहेत. 

शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनीही आता शिवसेनेवर शिल्लकसेना म्हणत टिका केली आहे. ज्या विचारामधून संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला आणि ज्यांच्या पाठबळावर ही संघटना विस्तारली त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत त्यांनी युती करायला हवी होती मात्र तसे न करता त्यांनी शिल्लक सेनेसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा नक्की कुणाच्या सांगण्यावरून घेतला असेल हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो, असे म्हात्रेंनी म्हटलं आहे. 

संभाजी ब्रिगेडसोबत युती करून प्रबोधनकार ठाकरे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जात पात विरहित राजकारण करण्याच्या परंपरेला छेद देण्याचा  केलेला प्रयत्न सर्वसामान्य शिवसैनिकाला निश्चितच पटला नसेल. युती सरकार सत्तेत असताना स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याविरोधात ज्या ब्रिगेडने उच्च न्यायालयात धाव घेतली, त्यांना सोबत घेण्याचा शिल्लक सेनेचा निर्णय निश्चितच भूषणावह नाही, अशा शब्दात म्हात्रे यांनी शिवसेना-संभाजी ब्रिगेडच्या युतीवर टिका केली आहे.  

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेमुंबईएकनाथ शिंदे