शिवनेरी पुण्याच्या पुढे धावणार, कोणते कोणते मार्ग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 07:16 IST2026-03-05T07:15:53+5:302026-03-05T07:16:07+5:30
सध्या मुंबई–पुणे, ठाणे–पुणे या मार्गांवर ई-शिवनेरी बस सेवा सुरू आहे. ही सेवा राज्यभर विस्तारासाठी २०० व्होल्व्हो बस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

शिवनेरी पुण्याच्या पुढे धावणार, कोणते कोणते मार्ग...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाची मुंबई–पुणे मार्गावर धावणारी शिवनेरी बससेवा राज्यभर विस्तारण्याची तयारी महामंडळाकडून करण्यात येत आहे. एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी बस लवकरच राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान धावणार असल्याची माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
सध्या मुंबई–पुणे, ठाणे–पुणे या मार्गांवर ई-शिवनेरी बस सेवा सुरू आहे. ही सेवा राज्यभर विस्तारासाठी २०० व्होल्व्हो बस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बस ताफ्यात दाखल होताच, मुंबई–पुणेप्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानही शिवनेरी सेवा सुरू होणार आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच नवीन २०० बसमध्ये ३० शयनयान (स्लिपर) बसचा समावेश असेल. सध्या ज्या मार्गांवर विना-वातानुकूलित शयनयान बससेवा आहे, तेथे ‘स्लिपर शिवनेरी’ सुरू करण्यात येणार आहे.
नाशिक–पुणे, नाशिक–छ. संभाजीनगर, नाशिक–जळगाव–धुळे, पुणे–कोल्हापूर, पुणे–सांगली, पुणे–सोलापूर, नागपूर–चंद्रपूर, नागपूर–अमरावती–अकोला या मार्गावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.