शिवाजी पार्क होणार हिरवेगार! राजकीय कार्यक्रमांसाठीही खड्डे खोदण्यास मनाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 08:45 IST2025-02-04T08:42:58+5:302025-02-04T08:45:54+5:30
Mumbai News: शिवाजी पार्क मैदानातील धुळीमुळे मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याचा तक्रारी करण्यात आल्या होत्या.

शिवाजी पार्क होणार हिरवेगार! राजकीय कार्यक्रमांसाठीही खड्डे खोदण्यास मनाई
मुंबई : शिवाजी पार्क मैदानातून उडणाऱ्या धुळीमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी तेथे गवत लावण्यात येणार आहे. हे काम महापालिका करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिली. शिवाय शिवाजी पार्कमध्ये कोणत्याच कार्यक्रमांसाठी खोदकाम करण्यास आता परवानगी दिली जाणार नाही. राजकीय कार्यक्रमांचाही अपवाद करण्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.
शिवाजी पार्क मैदानातील धुळीमुळे मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याचा तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मैदानाची पाहणी करून उपाय योजनांसदर्भात बैठका घेण्यात आल्या.
कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आजपासून शिवाजी पार्कातील धूळ निर्मूलन कामाची सुरुवात करण्यात येईल. या कामाचे टेंडर महापालिका काढील. मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिने काम करण्यात येईल. मे महिन्याच्या अखेरपर्यंत शिवाजी पार्कात गवताचे बी टाकले जाईल. त्यामुळे पावसात मैदान हिरवेगार होईल. कामाची सर्व जबाबदारी महापालिकेला देण्यात आली आहे, असेही कदम यांनी सांगितले.
संपूर्ण मैदानात गवताचे बी पेरणार
शिवाजी पार्क मैदानात स्थानिक प्रजातीचे गवत लावले जाईल. त्यासाठी आयआयटीची मदत घेतली जाईल. गवताचे लॉन टाकण्याऐवजी मातीतून उगविणाऱ्या गवताला प्राधान्य दिले जाईल. जंगली गवत लावले जाणार नाही.
क्रिकेट क्रीडांगणाचा भाग वगळता संपूर्ण मैदानात गवत लावले जाईल. क्रिकेटसाठी नेट लावण्याकरिताही खोदकाम करण्याची गरज भासणार नाही. तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. खोदकामाविनाही नेट लावता येते. त्यामुळे मैदानाची हानी होणार नाही.
अन्य मैदानांतही गवत लागवड
पिण्याचे पाणी गवतासाठी वापरण्याऐवजी एसटीपीमधील पाण्याचा वापर केला जाईल. त्यामुळे पाण्याची बचत होईल. माती काढणे हा पर्याय नाही. त्यामुळे गवत लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मातीला बांधून ठेवेल, असे गवत लावले जाईल. मुंबईतील अन्य मैदानांतही गवत लावले जाईल. शिवाजी पार्क हा पायलट प्रोजेक्ट आहे.