शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्या दौरा करणार; तारीख लवकरच ठरवू- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 15:57 IST2022-04-17T15:52:19+5:302022-04-17T15:57:21+5:30

मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आगामी मे महिन्याच्या सुरुवातील अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Shiv Sena to visit Ayodhya under Shivsena Leader Aditya Thackeray; Said That Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्या दौरा करणार; तारीख लवकरच ठरवू- संजय राऊत

शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्या दौरा करणार; तारीख लवकरच ठरवू- संजय राऊत

मुंबई- शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत राज्यातील सत्तेत सहभागी झाली आणि हिंदुत्वापासून दुरावल्याची टीका भाजपासह विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. अशातच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मराठीसह हिंदुत्वाचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच अडचण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कपड्यांचे रंग बदलून हिंदुत्व येत नाही. हिंदुत्व हे रक्तात असावं लागतं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. तसेच आमच्या मनात आणि रक्तात हिंदुत्व आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. 

मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आगामी मे महिन्याच्या सुरुवातील अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर त्यांनी स्वत: आज स्पष्टीकरण दिलं आहे. आपण लवकरच दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे. मी याबाबत कालच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत चर्चा केली. अयोध्या दौऱ्याची तारीख काय असावी, याबाबतही संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. 

संजय राऊत यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना म्हटलं आहे की, प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. राम जन्मभूमीच्या लढ्यात शिवसेना पहिल्यापासून आहे. शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात अयोध्या दौरा करणार आहे. मात्र आमचा अयोध्या दौरा राजकीय नाही. आमचा दौरा श्रद्धेसाठी आहे. शिवसैनिकांची अयोद्धेला जाण्याची इच्छा आहे. ती कोरोनामुळे पूर्ण झालेली नाही. परिस्थिती बघून तारीख जाहिर करु, असं संजय राऊत म्हणाले. 

आज राज ठाकरेंनी केल्या मोठ्या घोषणा-

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार आहे अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. मुस्लीम बांधवांनी हा विषय धर्मावर नेऊ नये. सामाजिक विषय आहे. 

भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.

Web Title: Shiv Sena to visit Ayodhya under Shivsena Leader Aditya Thackeray; Said That Shivsena MP Sanjay Raut