Join us
Daily Top 2Weekly Top 5

ललित पाटीलवरुन आता आरोप-प्रत्यारोप; उद्धव ठाकरे म्हणाले, “दसरा मेळाव्यात बोलेन”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 05:59 IST

ललित पाटीलने शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा संजय राऊत संपर्क नेते होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर राजकारण आणखी तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी याला प्रत्युत्तर देताना ललित पाटील शिवसेनेचा नाशिक शहराध्यक्ष होता, असे गृहमंत्री म्हणत असतील तर हे म्हणजे बॉम्बस्फोटाच्या वेळी दहशतवादी दाऊद इब्राहिम भाजपचा अध्यक्ष होता, असे म्हटल्यासारखे आहे, अशा शब्दांत शनिवारी निशाणा साधला. या विधानानंतर ठाकरे आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, या प्रकरणात सत्य काय आहे, हे सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर अरविंद सावंत, संजय राऊत आणि सुषमा अंधारे बोलत आहेत. परंतु, फडणवीसांकडे त्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. दसरा मेळाव्यात याबाबत सविस्तर बोलेन.

तो शाखाप्रमुखही नव्हता: दत्ता गायकवाड

ललित पाटील साधा शाखाप्रमुखही नव्हता. तो कधी पक्षाच्या कार्यालयातही आला नव्हता. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे त्याला मातोश्रीवर घेऊन गेले होते. त्यांनी प्रवेश घडवून आणला. केवळ महिनाभर तो पक्षात होता, त्याला साधे शाखाप्रमुख पदही दिले गेले नव्हते, असा दावा ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी केला

ठाकरेंनी शिवबंधन बांधले : दादा भुसे

सुषमा अंधारे यांच्याकडून दादा भुसे यांना लक्ष्य केले असताना ठाकरेंच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेल्या भुसे यांनी त्यांच्यावरच निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच ललित पाटील याला शिवबंधन बांधण्यात आले. एवढं महत्त्व त्या पक्षप्रवेशाला देण्यात आले. मग कोणत्या नेत्यामुळे प्रवेश झाला, त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही भुसे म्हणाले.

अजूनही शिवसेनेत :  नीलम गोऱ्हे

ललितने शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा संजय राऊत संपर्क नेते होते. पाटीलची चौकशी करणे ही त्यांचीही जबाबदारी होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दादा भुसे शिंदे गटात गेले. ललित पाटील ठाकरे गटातच आहे. त्याने राजीनामाही दिलेला नाही, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

 

टॅग्स :ललित पाटीलउद्धव ठाकरेशिवसेना