CM Devendra Fadnavis PC News:मतदारयादीत जर घोळ आहे, तर त्याच्या पुनरीक्षणाला विरोध का करता? व्यापक पुनरीक्षण हाच यावरील उपाय आहे. गेल्या २५ वर्षांत व्यापक सुधारणा न झाल्यामुळे मतदारयाद्यांमध्ये दोष निर्माण झाला आहे. २०१२ मध्ये मी स्वतः या दोषांविरोधात उच्च न्यायालयात गेलो होतो. आजही ती याचिका प्रलंबित आहे. मी त्यावेळेस मागणी हीच केली होती की, व्यापक पुनरीक्षण करा. आता निवडणूक आयोगाने व्यापक पुनरीक्षण करायला सुरुवात केली आहे, तर ते यालाही विरोध करतात. हे अतिशय चुकीचे आहे. त्याला तुम्ही का विरोध करता. पुनरीक्षण झाले, तरच याद्या योग्य होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत विधान केले होते. विरोधकांनीही गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा लावून धरला आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, ते मी २०१६-१७ पासून बोलत आहेत. हे लोक आता बोलायला लागले आहेत. आमचे लोकांनी तपासायला सुरुवात केली आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोनच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे. या दोन पक्षाव्यतिरिक्त बाकी पक्षांची मुंबईत एवढी ताकद नाही, त्यामुळे कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरेंनी केल्याचे समजते. राज ठाकरे यांनी केलेल्या या दाव्याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली.
मला त्याबाबत काही म्हणायचे कारण नाही
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपा सर्वांत मोठा पक्ष होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही मुंबईत भाजपा मोठा पक्ष होता. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतदेखील मुंबईत सर्वांत मोठा पक्ष भाजपाच आहे. अर्थात कुणाला स्वतःचा पक्ष मोठा वाटत असेल, तर मला त्याबाबत काही म्हणायचे कारण नाही. आपला पक्ष मोठा आहे, असे म्हणायचा सगळ्यांना अधिकार आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, दादर कबुतरखाना प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. जैनमुनींनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने जे निर्बंध घातले आहेत, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असे मला वाटते. दुसरे म्हणजे कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात, हे बहुतेक सगळ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. कबुतरांना खायला घालू नये, याबाबत उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही धर्माच्या नावाखाली कबुतरांना खायला घातले जात असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. कारण एकदा या गोष्टीला सुरुवात झाली की, बाकीचे तसेच वागायला सुरुवात करणार. असे होणार असेल, तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय म्हणायचे कशाला, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.