Join us

“मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंना घरात कोंडून ठेवले, आईने केलेले हे प्लॅनिंग”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 20:00 IST

Shiv Sena Shinde Group News: मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रींनी केलेला अट्टाहास म्हणजे उद्धव ठाकरेंना घरात ठेवणे, असे मोठे विधान शिवसेना शिंदे गटातील एक नेत्याने केले आहे.

Shiv Sena Shinde Group News: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता त्यानंतर पुढील टप्प्यासाठी प्रक्रिया तसेच प्रचाराला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आरोप-प्रत्यारोपांची फैरी तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच उद्धव ठाकरेंनी केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटानंतर आता शिवसेना शिंदे गटातील नेत्याने रश्मी ठाकरे यांचे नाव घेऊन मोठे विधान केले आहे.

देवेंद्र फडणवीस २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री होते. आदित्यने विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस मला म्हणाले की, आदित्यला चांगला तयार करतो. अडीच वर्षानंतर त्याला मुख्यमंत्री करू. त्यावेळीच मी त्यांचा विरोध केला. आदित्य अजून लहान आहे, त्याच्या डोक्यात हे असे काही घालू नका, असे सांगितले. आदित्यला मुख्यमंत्री केले, तर अन्य ज्येष्ठ नेते त्याच्या हाताखाली काम कसे करणार? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, मी अडीच वर्षानंतर दिल्लीत जाणार. मला अर्थखात्यातले जरा कळते. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात जाऊन अर्थखाते पाहण्यात रस होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी मोठा दावा केला आहे. 

मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंना घरात कोंडून ठेवले

एका कार्यक्रमात बोलताना सदा सरवणकर यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबत एक मोठे विधान केले. एक अतिशय विचित्र व्यक्तिमत्व, जे दिसतेय खुळे, पण अतिशय कपटी. मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रींनी केलेला अट्टाहास म्हणजे उद्धव ठाकरेंना अडीच वर्षं घरात कोंडून ठेवणे. त्यांना घरात कोंडून ठेवायचे, मुलाला थोडे पुढे आणायचे आणि मग त्याला मुख्यमंत्री करायचे हे त्यांच्यातल्या आईचं प्लॅनिंग होते, असे मोठे वक्तव्य सदा सरवणकर यांनी केले. यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

दरम्यान, मदत करणारा माणूस म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जात होते. आता राज ठाकरे यांचे नाव घेतले जाते. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे राज्यात स्वागत केले जात आहे. खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांचे विचार राज ठाकरे पुढे नेण्याचे काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वसाठी काम करत होते आता राज ठाकरे करत आहेत. पत्नी आजारी होती, तेव्हा हिंदुजामध्ये बेड मिळावा, यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांना फोन केला होता. ७ व्या मिनिटाला मदतीसाठी राज ठाकरे यांचा कॉल आला. मात्र, ७ तास झाले तरी उद्धव ठाकरे यांचा कॉल आला नाही, असे सदा सरवणकर यांनी सांगितले. 

टॅग्स :शिवसेनाआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेसदा सरवणकर