“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:35 IST2025-07-04T15:33:35+5:302025-07-04T15:35:57+5:30
Shiv Sena Shinde Group Minister Sanjay Shirsat News: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या २ हजार २८९ महिलांना वगळले आहे.

“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
Shiv Sena Shinde Group Minister Sanjay Shirsat News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली. परंतु, ही योजना जाहीर केल्यापासून विरोधकांनी जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. परंतु, ते आश्वासन पूर्ण करत नसल्याबाबत विरोधक महायुती सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यातच आता काही विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला जात असल्याबाबतही सरकारवर टीका होत आहे.
सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेला वर्ग केला जात असल्याबाबत या खात्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती. यावरून त्यांनी टीकाही केली होती. परंतु, आता दर महिन्याला सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला जात आहे. यावर आता वाद घालत नाही, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संजय शिरसाट विधान भवनात पत्रकारांशी बोलत होते.
अजित पवार यांनी कबूल केले आहे की...
माझ्या खात्यामधून दर महिन्याला ४१० कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केला जातो. हा एकंदरीत प्रक्रियेचा भाग दर महिन्याला पूर्ण केला जातो. दर महिन्याला त्या फाइल मला मंजूर कराव्या लागतात. याबाबतची कल्पना मला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनाही ही गोष्ट सांगितली आहे. अजित पवार यांनी पैसे देण्याचे कबूल केले आहे. म्हणून मी आता वाद न घालता दर महिन्याला ४१० कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी देत असतो, असे संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या २ हजार २८९ महिलांना वगळले आहे. योजनेतून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली.