Join us

७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 05:59 IST

माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या सूचना; अजूनही काही माजी नगरसेवक, शाखाप्रमुख कुंपणावर, निवडणूक जाहीर होताच तेही शिंदेसेनेत प्रवेश

सुजित महामुलकर, लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई: देशात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी महायुतीकडून सुरू झाली आहे. महायुतीत शिंदेसेना २२७ पैकी किमान १०० जागांवर दावा ठोकणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे भाजपच्या पोटात गोळा आल्याची चर्चा आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील बहुतेक प्रमुख राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. विशेषतः भाजप आणि शिंदेसेना निवडणूक मोडमध्ये गेल्याचे चित्र आहे. भाजपने काही आढावा बैठका घेतल्या तशा शिंदेसेनेनेही बुधवारी माजी नगरसेवकांची मेगाबैठक घेऊन तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

माजी नगरसेवकांची ही बैठक शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या ‘जंजिरा’ बंगल्यावर दोन टप्प्यांत झाली. एका बैठकीला २०१७ ते २०२२ या शेवटच्या टर्ममधील आणि दुसऱ्या टप्प्यातील बैठकीला त्यापूर्वीच्या माजी नगरसेवकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट संवाद साधला. दोन्ही बैठकांना मिळून जवळपास ५५-६० माजी नगरसेवक उपस्थित होते, असे सांगण्यात आले. यावेळी दादाजी भुसे, माजी खा. राहुल शेवाळे, पक्षाचे सचिव संजय मोरे आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

२०१७-२०२२ या टर्ममधील उद्धवसेनेचे जवळपास ४६ नगरसेवक शिंदेसेनेने गळाला लावले आहेत. त्यांसह अन्य काही जुने माजी नगरसेवक मिळून साधारण ७०-७५ संभाव्य उमेदवारांची तयारी शिंदेसेनेने केल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय अजूनही काही माजी नगरसेवक, शाखाप्रमुख कुंपणावर आहेत. निवडणूक जाहीर होताच तेही शिंदेसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती एका माजी नगरसेवकाने दिली.

रणनीती काय?  

ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा दबदबा असला तरी मुंबईत शिंदेसेनेला जोर लावावा लागेल, असे सांगितले जाते. मुंबईत भाजपचा महापौर बसला तर किमान उपमहापौर आणि अन्य समित्यांचे अध्यक्षपद आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी अधिकाधिक नगरसेवक निवडून आणणे शिंदेसेनेला क्रमप्राप्त असल्याने पक्ष जोमाने कामाला लागल्याचे चित्र आहे.

विविध राजकीय पक्षांतून शिंदेसेनेत दाखल झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांशी संवाद साधला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना तयारीला लागण्याचे निर्देश दिले. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

 

टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२५शिवसेनाएकनाथ शिंदेभाजपा