Join us

गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय?; सरवणकरांनी राज ठाकरेंना बॅनरमधून डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:00 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिवसेना शिंदे गटाने बॅनरमधून उत्तर दिलं आहे.

Samadhan Sarvankar on Raj Thackeray:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाढव्याच्या मेळाव्यात बोलताना गंगेच्या प्रदूषणावरुन भाष्य केलं होतं. यावेळी त्यांनी महाकुंभ मेळ्याच्याही उल्लेख करत टीका केली होती. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरुन देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. यानंतर आता शिवसेना शिंदे गटाने राज ठाकरे यांना डिवचलं आहे. राज ठाकरेंनी कुंभ मेळाव्याविषयी केलेल्या विधानावरुन माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी टीका केली. शिवसेना युवा अधिकारी समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर मोठा फलक लावला आहे.

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पुन्हा एकदा गंगा नदीतील प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. कुंभमेळ्यात अंघोळ केलेले लाखो लोक आजारी पडल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. राज ठाकरेंच्या या विधानावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांना लक्ष्य केलं. त्यानंतर माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी शिवसेना भवनासमोर मोठं बॅनर लावत राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय? असा सवाल समाधान सरवणकर यांनी विचारला आहे.

बॅनरवर काय लिहीलं?

"१४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभ सोहळ्यात जगभरातील ६० कोटींहून अधिक हिंदू बांधवांनी त्रिवेणी संगमात स्नान करून अखंड हिंदू एकात्मतेचा संदेश दिला. कुंभमेळा हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर हिंदू संस्कृतीच्या गौरवशाली भव्यतेचे जिवंत प्रतीक आहे. हा क्षण अभिमानाचा आणि गौरवाचा होता. हा क्षण हिंदूंच्या एकजुटीचा होता. गंगाजल शुद्धच आहे, पण काही लोकांच्या विचारांचं काय?," असा मजकूर या बॅनरवर लिहीण्यात आला आहे.

"अनेक वर्षांनी हिंदू एकजूट झाले होते. हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय होता. हिंदू एकजूट झाले तर त्यांना टार्गेट केलं जातं. गंगा शुद्ध झाली पाहिजे हे कोणी नाकारत नाही.  ज्यावेळी देशभरातून ६० कोटी हिंदू एका ठिकाणी येतात त्यावेळी हिंदूना टार्गेट केलं जातं. अशा गोष्टी एका हिंदू नेत्याकडून होतात. निवडणुकीत हिंदू नेता म्हणून घेतलं जातं पण त्यांच्याकडून दरवेळी हिंदूंनाच टार्गेट केलं जातं," असं समाधान सरवणकर म्हणाले.

"प्रत्येक वेळी आपली भूमिका बदलत राहता. एकदा हिंदूंच्या मुद्द्यावरुन ते बदलून मराठीच्या मुद्द्यावरुन बोलणार. मग झेंड्यांमध्ये एखादा रंग टाकणार. प्रत्येक वेळी आपली भूमिका बदलत राहिलात तर जनता सुद्धा हुशार आहे. मराठी मतदारांना माहिती आहे की हे दरवेळी आपली भूमिका बदलतात. हिंदूंनी यांना विधानसभेला नाकारून दाखवून दिलं आहे, असंही सरवणकर म्हणाले. 

टॅग्स :राज ठाकरेकुंभ मेळामनसे