“लाडक्या बहि‍णींचे २१०० रुपये, शेतकरी कर्जमाफीचे काय करणार आहात”; राऊतांचा सरकारला सरळ सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:25 IST2025-03-13T12:23:52+5:302025-03-13T12:25:55+5:30

Thackeray Group Sanjay Raut News: होळीला परवानगी नाही, गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी, हे कसले हिंदुत्व, असा सवाल करत, शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देणारे १०० शेतकरी भाजपाचे एजंट असल्याचा दावा संजय राऊतांनी केला.

shiv sena sanjay raut criticized mahayuti govt over ladki bahin yojana farmer loan waiver and shaktipeeth mahamarg | “लाडक्या बहि‍णींचे २१०० रुपये, शेतकरी कर्जमाफीचे काय करणार आहात”; राऊतांचा सरकारला सरळ सवाल

“लाडक्या बहि‍णींचे २१०० रुपये, शेतकरी कर्जमाफीचे काय करणार आहात”; राऊतांचा सरकारला सरळ सवाल

Thackeray Group Sanjay Raut News: शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणी केली होती? शक्तिपीठ मार्गाची मागणी करून गेल्या काही वर्षात ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले गेले. त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले. टेंडर देण्यात आले. ते पैसे निवडणुकीचत वापरले असतील किंवा आमदार खरेदीसाठी वापरले असावेत, असा मोठा आरोप करत, शक्तिपीठ मार्गासाठी शेतकरी भूमी अधिग्रहण करण्याच्या विरोधात आहेत. मुळात शक्तिपीठ महामार्गाची गरज काय, अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गासाठी १०० शेतकरी त्यांना भेटले. हे १०० शेतकरी जे आहेत, ते भाजपाचे एजंट असावेत. त्यांच्या माध्यमातून जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असावेत. सामान्य शेतकऱ्यांना आपली जमीन द्यायची नाही. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तुमच्याकडे १०० शेतकरी आले म्हणून चुकीच्या योजनेच समर्थन होऊ शकत नाही. हा महामार्ग खरेच गरजेचा आहे का, हे तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्यावे. तुम्हाला तुमच्या मर्जीतील ठकेदारांना मालामाल करुन त्या पैशातून निवडणुका लढवायच्या आहेत, म्हणून शक्तीपीठ महामार्ग हवा का, या शब्दांत संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. 

लाडक्या बहि‍णींचे २१०० रुपये, शेतकरी कर्जमाफीचे काय करणार आहात

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, जाहीरनाम्यात त्यांच्या दोन प्रमुख घोषणा आहेत, लाडक्या बहिणींना २१०० रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी. त्याचे तुम्ही काय करणार याचे उत्तर जनतेला मिळायला हवे. ९ लाख ३२ हजार कोटींचे महाराष्ट्रावर कर्ज आहे. हा एवढा मोठा कर्जाचा डोंगर तुम्ही कसा कमी करणार आहात? राज्यावरच कर्जाचे ओझे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हे माहिती असताना लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या. आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत. शिवभोजन थाळीसारख्या गरिबांच्या योजना, शिधा योजना अशा अनेक योजना बंद केल्या. आता लाडकी बहीण योजना बंद करतील, असा मोठा दावा संजय राऊतांनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, वरळीत होळीला परवानगी मिळत नाही. त्यानंतर आता उद्या गणेशोत्सव येणार आहे. पीओपीच्या मूर्तींवर बंदी आणलेली आहे, हे कसले हिंदुत्व? वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर तुम्ही बंधन आणत आहात. आमच्या राज्यात हिंदुंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगता होता, मग आता काय झाले, अशी विचारणाही संजय राऊतांनी केली आहे. 

 

Web Title: shiv sena sanjay raut criticized mahayuti govt over ladki bahin yojana farmer loan waiver and shaktipeeth mahamarg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.