Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे कोकणचा कायापालट करताहेत, प्रकल्प पळवायचा प्रयत्न केल्यास...; शिवसेनेचा काँग्रेसच्या मंत्र्याला इशारा

By मुकेश चव्हाण | Updated: October 6, 2020 10:45 IST

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: सिंधुदुर्गात होत असलेला आयुष मंत्रालयाचा प्रकल्प मंत्री अमित देशमुख लातूरला नेण्याची मागणी केल्याने महाविकास आघाडीत ठिणगी पडण्यास सुरुवात झाली आहे. कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्याची मागणी केल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली आहे. सिंधुदुर्गाच्या वाट्याला येणारा प्रकल्प पळवून नेण्याच्या प्रयत्नाचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो. कोकणातले असे अनेक प्रकल्प पळवण्याचे प्रयत्न झाले आहेत," अशा शब्दात विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.

'एबीपी माझा'च्या वृत्तानूसार, केंद्र सरकारचा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प दोडा मार्गमधील आढाळी भागात उभारण्यात येणार आहे. "आयुष मंत्रालयाकडून कोकणाला यासाठी मंजुरी मिळाली आहे, यासंदर्भात अभिप्राय मागवला असताना अचानक हा प्रकल्प लातूरला हलवा, अशी मागणी अमित देशमुख यांनी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. हे पूर्वनियोजित असून अत्यंत निंदनिय आहे, असं म्हणत  अमित देशमुख यांच्या या मागणीनंतर विनायक राऊत चांगलेच आक्रमक झाले आहे. 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल प्लांट हा प्रकल्प कोकणातच होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.  त्यामुळे प्रकल्प पळवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही. आतापर्यंत कोकणाला न्याय मिळत नव्हता. पण आता उद्धव ठाकरे कोकणाला बदलत आहेत. जर हा प्रकल्प कोण पळवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो हाणून पाडू, असा इशारा देखील विनायक राऊत यांनी अमित देशमुख यांना दिला आहे. 

अमित देशमुख यांनी केलेला हा प्रकार निंदनीय आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख असते तर अशा घटना घडल्या नसत्या. त्यांचं प्रेम वेगळं होतं. पण अमित देशमुखांनी आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिली नाही. पत्रव्यवहार केले पण उत्तरं दिली नाहीत. हे अशोभनीय आहे. अमित देशमुखांनी विलासरावांचे गुण घेतले पाहिजे, असा सल्ला देखील विनायक राऊत यांनी केला अमित देशमुखांना दिला आहे. त्यामुळे आता विनायक राऊत यांनी अमित देशमुखांच्या या प्रकरणावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेविनायक राऊत अमित देशमुखकाँग्रेसशिवसेनाकोकणमहाराष्ट्र विकास आघाडी