उदय सामंत अन् केसरकरांमुळे शिवसेना वाढली नाही; पक्षानेच त्यांना वाढवलं- विनायक राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 14:00 IST2022-07-05T14:00:20+5:302022-07-05T14:00:44+5:30
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी बंडखोर आमदार उदय सामंत आणि दीपक केसरकरांवर टीका केली आहे.

उदय सामंत अन् केसरकरांमुळे शिवसेना वाढली नाही; पक्षानेच त्यांना वाढवलं- विनायक राऊत
भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. ते पुढे म्हणाले की, आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ, जर चुकत असेल, तर आपल्याला जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल, तर जनता तुम्हाला घरी बसवेल. हिंमत असेल तर भाजपाने मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी देखील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. ख्ख्या देशाला लांच्छनास्पद ठरेल असे राजकारण भाजप पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात घडले. दुर्देवाने शिवसेनेचे ४० आमदार त्याला बळी पडले. सत्तेची लालसा व मुख्यमंत्रीपदाचा हव्यास त्याला कारणीभूत ठरला, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
विनायत राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर देखील निशाणा साधला. उदय सामंत किंवा दीपक केसरकर यांचा आयत्या बिळात नागोबाप्रमाणे शिवसेनेत प्रवेश झालेला होता. त्यांच्यामुळं शिवसेना वाढलेली नाही, शिवसेनेनं त्यांना वाढवलेलं असल्याचं, विनायक राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान, रत्नागिरी येथे १० जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा केवळ निष्ठावंतांसाठी असणार आहे. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना या मेळाव्यात येण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असा इशारा देखील विनायक राऊत यांनी यावेळी बंडखोर आमदारांना दिला.