Shiv Sena leader Urmila Matondkar has lauded the winning candidates of Maharashtra vikas Aghadi | "शेतकरी अन् कष्टकऱ्यांसह उच्चशिक्षित मतदारही महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे"

"शेतकरी अन् कष्टकऱ्यांसह उच्चशिक्षित मतदारही महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे"

मुंबई: विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारत भाजपाला धूर चारली आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. याचदरम्यान आता नुकत्याच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटद्वारे महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे कौतुक केले आहे. 

उर्मिला मातोंडकर ट्विट करत म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबत उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे, हे या निकालाने सिद्ध होते, असं उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी सांगितले. 

विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशाकरता महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि सतिश चव्हाण, जयंत आसगांवकर यांचे अभिनंदन, असं ट्विट उर्मला मातोंडकर यांनी केलं आहे. 

तत्पूर्वी राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकालांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे. तर दुसरीकडे पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपाला लक्ष्य केले जात आहे. 

'वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो'- अमृता फडणवीस 

 ''वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो'', असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे. 

मुख्यमंत्र्यांचा विचार आवडला- उर्मिला मातोंडकर

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला. त्यांनी माझ्याशी कुटुंबातील सदस्याप्रमाणे बातचित केली. विधानपरिषदेचा सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा समृद्ध आहे, तो वारसा वाढवण्यासाठी आपण शिवसेनेत यावं, हा उद्धव ठाकरेंचा विचार मला आवडला'', असं उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगितलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena leader Urmila Matondkar has lauded the winning candidates of Maharashtra vikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.