Join us  

मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे तुमचे बंधू नाराज आहेत का?; संजय राऊत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 12:44 PM

Maharashtra Cabinet Expansion : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना देखील मंत्रिपद देणार असल्याचे सांगण्यात येत होते.

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागली आहे. तसेच अनिल परब, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्यासह 13 नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना देखील मंत्रिपद देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र शिवसेनेकडून जाहिर केलेल्या मंत्रिमंडळाच्या यादीत सुनिल राऊत यांना स्थान नसल्याचे समोर आले आहे. तसेच मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे सुनिल राऊत नाराज असल्याची चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.

संजय राऊतमंत्रिमंडळाच्या विस्तारावर म्हणाले की, एक चांगल आणि अनुभवी असलेलं मंत्रिमंडळ असून चांगलं काम करुन राज्याला दिशा देईल असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. तसेच सुनिल राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नसल्याने आमच्या घरातील कोणीही नाराज नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. सरकार स्थापन करण्यात आम्हाला महत्वाची भूमिका निभावता आली त्यातचं आम्ही समाधानी असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 

मंत्रिमंडळात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे, अनिल परब, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, संजय राठोड, दादा भुसे, संदीपान भुमरे, उदय सामंत, शंकरराव गडाख, शंभूराज देसाई, बच्चू कडू, राजेंद्र येड्रावकर आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. 

महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी, काँग्रेसचे दिल्लीतील नेते मल्लिकार्जुन खर्गे देखील मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. शामियाना उभारून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांच्या दिमाखदार शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला होता.

टॅग्स :संजय राऊतसुनील राऊतमहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरेशिवसेनामंत्रिमंडळ विस्तारमहाराष्ट्र विकास आघाडी